नफावसुलीमुळे निर्देशांकांत घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नफावसुलीमुळे निर्देशांकांत घसरण
नफावसुलीमुळे निर्देशांकांत घसरण

नफावसुलीमुळे निर्देशांकांत घसरण

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : रिझर्व बँकेच्या पतधोरणात व्याजदर वाढीची भीती असल्यामुळे गुंतवणूकदारांनी आज सावधगिरीचे धोरण स्वीकारीत नफावसुली केली. त्यामुळे आज सेन्सेक्स ३३.९० अंश घसरला, तर निफ्टीदेखील ४.९५ अंश वाढला.
आज सकाळी निर्देशांक थोडे तेजीत होते, मात्र नंतर विक्रीचा मारा आल्यामुळे ते घसरले. त्यानंतर वातावरण संमिश्रच राहिले व दिवसअखेर सेन्सेक्स ६२,८३४.६० अंशांवर, निफ्टी १८,७०१.०५ अंशांवर स्थिरावला. या आठवड्यात रिझर्व बँकेचे पतधोरण जाहीर होणार असून त्यात ०.३५ टक्के व्याजदरवाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सावध होते, त्यातच ओपेकच्या निर्णयामुळे कच्च्या तेलाचीही दरवाढ झाली. चीनने कोविड निर्बंध शिथिल केल्यामुळेही क्रूडच्या भाव वाढीला बळ मिळाले. त्यामुळेही बाजारात नफावसुली झाली. आयटी शेअरची जास्त नफा वसुली झाली. वाहननिर्मिती क्षेत्राच्या शेअरच्या भावातही वाढ झाली. बँका आणि धातूनिर्मिती कंपन्यांच्या शेअरचे दर वाढले.

आज रिलायन्स, टेक महिंद्र, अल्ट्राटेक सिमेंट, डॉक्टर रेड्डीज लॅब, ॲक्सिस बँक, एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, महिंद्र आणि महिंद्र, मारुती, टीसीएस या शेअरचे भाव अर्धा ते दीड टक्का घसरले; तर टाटा स्टील तीन टक्के वाढून ११५ रुपयांवर गेला. त्याखेरीस एनटीपीसी, स्टेट बँक, इंडसइंड बँक, पॉवरग्रीड या शेअरचे भाव एक ते दीड टक्का वाढले.

रुपया ४७ पैसे घसरला
..................................
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आज रुपया ४७ पैसे घसरून ८१.८० वर बंद झाला. आज व्यवहार सुरू झाल्यावर रुपयाचा भाव ८१.२६ होता. व्यवहारादरम्यान तो ८१.२५ एवढा वाढला, तर ८१.८२ एवढा घसरला. शुक्रवारी तो ८१.३३ वर बंद झाला होता.