पहिलाच दिवस हतबलतेचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिलाच दिवस हतबलतेचा
पहिलाच दिवस हतबलतेचा

पहिलाच दिवस हतबलतेचा

sakal_logo
By

कल्याण, ता. ५ (बातमीदार) : कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामांना गती देण्यासाठी तो परिसर खुला करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पर्यायी व्यवस्थेबाबत घोषणा केली होती; मात्र पहिल्या दिवशी अन्य सरकारी यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवासी वर्गाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील महात्मा फुले चौक ते वलीपीर रोड परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत विविध विकासकामे सुरू आहेत. त्या कामांना गती देण्यासाठी तो परिसर काही महिने मोकळा करण्यासाठी शुक्रवारी (ता. २) पालिका आयुक्त दांगडे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयामध्ये बैठक झाली होती. स्थानकाबाहेर दोन रिक्षांची रांग असेल. त्यात एक रिक्षा मीटर आणि एक शेअर पद्धतीने धावेल, अशी घोषणा पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी केली होती; मात्र त्या आदेशाला केराची टोपली दाखवत रिक्षाचालकांनी मीटरने रिक्षा न चालवता परिस्थितीचा फायदा उचलत वाढीव भाडे घेत असल्याचे चित्र होते. काही काळ रुग्णवाहिका अडकल्या होत्या. त्यांना जागा देण्याऐवजी वाहतूक विभाग कर्मचारी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांच्या वाहनावर कारवाई करण्यात मश्गूल होते.

नवी मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या केडीएमटी आणि एनएमएमटी दुर्गाडीपासून धावल्या; मात्र अनेकांना माहीत नसल्याने रेल्वे स्थानकापासून गुरुदेव हॉटेलपर्यंत चालत येऊन उन्हातान्हात उभे राहत बस पकडत होते. अनेकांना पत्रिपूल येथे उतरून एक ते दोन किलोमीटर चालत स्थानक गाठावे लागले; तर अनेकांनी वाढीव भाडे देत रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या अन्य खासगी प्रवासी वाहनाने प्रवास केला. काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि जीप, अन्य वाहने अधिकृत असल्यास दुर्गाडीपासून सुटतील, अशी घोषणाही कागदावर राहिली. सरकारी यंत्रणांच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. स्थानक परिसराने मोकळा श्वास आजही घेतला नसल्याचे चित्र होते.

वरिष्ठांकडून आदेश आल्यावर पुढील अंमलबजावणी करण्यात येईल. मुळात दुर्गाडी आणि प्रेम ऑटो परिसरात प्रवासी नसल्याने बिर्ला कॉलेज रोडने बस एसटी डेपोमध्ये येऊन पुढे जात होत्या.
- विजय गायकवाड, एसटी डेपो व्यवस्थापक, कल्याण

आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार केडीएमटी दुर्गाडीपासून सुरू केल्या आहेत. हळूहळू प्रवासी वर्गासाठी सुविधा उपलब्ध केल्या जातील.
- डॉ. दीपक सावंत, व्यवस्थापक, केडीएमटी

आज पहिलाच दिवस असल्याने नियोजन सुरू आहे. आज बेशिस्त रिक्षाचालकांवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून वाहतूक पोलिसांनी ४८; तर आरटीओने १४ रिक्षाचालकांवर कारवाई करत वाहतूक पोलिसांनी पाच रिक्षा जप्त केल्या आहेत.
- महेश तरडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कल्याण वाहतूक विभाग