‘एक वही, एक पेन’ अभियानातून बाबासाहेबांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एक वही, एक पेन’ अभियानातून बाबासाहेबांना अभिवादन
‘एक वही, एक पेन’ अभियानातून बाबासाहेबांना अभिवादन

‘एक वही, एक पेन’ अभियानातून बाबासाहेबांना अभिवादन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : ग्रामीण, दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दार उघडे व्हावे, शैक्षणिक साहित्य मिळत नसल्याने शिक्षण अर्ध्यावर राहू नये यासाठी ‘फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट (फॅम)’ अंतर्गत दरवर्षी चैत्यभूमीवर ‘एक वही एक पेन’ उपक्रम राबवला जातो. या वर्षी या उपक्रमाला ८ वर्षे पूर्ण झाली असून, चैत्यभूमीवर येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांकडून मिळणारे वही-पेन गरजू विद्यार्थ्यांना वाटप केल्या जात असल्याचे ‘फॅम’चे सदस्य दत्ता जावळे यांनी सांगितले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्याने चैत्यभूमीवर येणाऱ्या बहुजनांसाठी फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट (फॅम) चे ‘एक पेन एक वही’ उपक्रम राबवला जात आहे. शिवाजी पार्क येथील मीनाताई पुतळ्याच्या बाजूला या उपक्रमाचा स्टॉल लावण्यात आला असून, चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना वही व पेन दान करता येणार आहे. यावर्षी एकाच वेळी राज्यभरात हे अभियान राबवले जात आहे. त्यामध्ये मुंबईसह, औरंगाबाद, सोलापूर, बीड, कंधार, राहुरी, श्रीरामपूर, अहमदनगर, चिपळूण, पुणे, नागपूर, सिल्लोड, नांदेड यांचा समावेश आहे.
या ठिकाणी जमा करण्यात येणाऱ्या वही-पेनाच्या साहित्याला दुर्गम भागातील आदिवासी व वंचित समुदायातील विद्यार्थ्यांना दिले जाते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची नागरिक प्रशंसा करत असून, अनुयायांनी फूल, मेणबत्ती बाबासाहेबांच्या चरणी अर्पण करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट (फॅम)ला वह्या, पेन दान करण्याचे आवाहन फॅम मुव्हमेंन्टने केले आहे.