वेहळोली गाव आता पूर्वपदावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेहळोली गाव आता पूर्वपदावर
वेहळोली गाव आता पूर्वपदावर

वेहळोली गाव आता पूर्वपदावर

sakal_logo
By

किन्हवली, ता. ७ : अनेक दिवसांपासून होत असलेल्या भूकंपाच्या धक्क्याने भयभीत झालेले वेहळोली गाव आता पूर्वपदावर येत आहे. अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय संघटनांचे पुढारी, जिल्हाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी यांच्या सततच्या भेटीने गजबजलेले गाव आता पुन्हा एकदा आपापल्या नोकरी व्यवसायात रमू लागले आहे. दररोज सात ते आठ वेळा बसणाऱ्या धक्क्यांचे सत्र आता हळूहळू कमी होऊ लागल्याने गावकऱ्यांचे जनजीवन सुरळीतपणे सुरू झाले आहे.

शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरात असलेल्या वेहळोली (खु) गावाला २९ नोव्हेंबरपासून ५ डिसेंबरपर्यंत रात्रंदिवस सातत्याने सौम्य व तीव्र स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसत होते. या दरम्यान भूगर्भातून स्फोटासारखे गूढ आवाज येत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. भूकंपाच्या धक्क्याने अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. गावापासून हाकेच्या अंतरावर असलेला पाझर तलाव फुटून अनर्थ घडेल, या भीतीनेच गावकऱ्यांची झोप उडाली होती.

सोमवार ५ डिसेंबरपासून धक्क्यांचे सत्र कमी झाले असून, भूगर्भातून येणाऱ्या गूढ स्फोटाचा आवाजही कमी झाला आहे. मुलेही शाळेत जाऊ लागली असून, रब्बी पिकाची लागवड केलेले शेतकरी शेतावर जाऊन आपली कामे करू लागले आहेत. व्यावसायिक व नोकरदार वर्ग आपापल्या परीने काम धंद्याकडे लक्ष देऊ लागला आहे. भीतीमुळे कुलूपबंद असलेली घरे आता खुली झाली असून, गृहिणींच्‍या
कामाची लगबग सुरू झाली आहे.

अधिकारी-पदाधिकाऱ्यांचे भेटीसत्र
भूकंपामुळे भयभीत झालेल्या गावकऱ्यांना धीर देण्यासाठी खासदार व केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार दौलत दरोडा, किसन कथोरे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाखचौरे, तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार ,विविध पक्षांचे राजकीय पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांनी गावाला भेट दिली. गावातील जनजीवन आता सुरळीतपणे सुरू झाल्‍याने, ग्रामस्‍थांच्‍या मनातील भीतीचे सावट दूर झाले आहे.
-----------------------------------
भूकंपाच्या भीतीमुळे नागरिक घाबरलेले होते. या दरम्यान अनेकांनी भेटी देऊन आम्हाला धीर दिला, मदत केली. महसूल व आरोग्य विभागानेही तत्परता दाखवली, त्यामुळे एवढ्या मोठ्या संकटातूनही आम्हाला बाहेर पडण्याची ऊर्जा मिळाली.
-वैशाली सुनील निमसे (वेहळोली)
सदस्या, कानडी ग्रामपंचायत