अखेर पेटिट रुग्णालयाचे काम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर पेटिट रुग्णालयाचे काम सुरू
अखेर पेटिट रुग्णालयाचे काम सुरू

अखेर पेटिट रुग्णालयाचे काम सुरू

sakal_logo
By

संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. ७ : वसईतील सर्वात जुने रुग्णालय म्हणून प्रसिद्ध असलेल्या डी. एम. पेटिट रुग्णालयाच्या बाजूला कोरोना काळात नव्या २०० खाटांच्या रुग्णालयाचे काम सुरू करण्यात आले होते; परंतु ज्या जागेत हे काम सुरू केले होते, तेथे पालिकेचा कर्मचारी राहत असल्याने हे काम बंद पडले होते; पण आता या रुग्णालयाचे काम पुन्हा सुरू झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
वसई तालुक्यातील सर्वात जुने म्हणजे इंग्रजांच्या काळात उभारलेले डी. एम. पेटिट रुग्णालय आता वाढत्या नागरीरणामुळे कमी पडत आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या मागील जागेवर महापालिकेचे तत्कालीन प्रशासक आणि आयुक्त डी. गंगाधरन यांच्या काळात नोव्हेंबर २०२० मध्ये २०० खाटांच्या रुग्णालयाचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम ११ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार होते; परंतु पालिकेतीलच एका कर्मचाऱ्याने त्या जागेवर दावा दाखल केल्याने या रुग्णालयाचे बांधकाम थांबले होते. याबाबत माजी आरोग्य समिती सभापती संतोष वळवईकर, दीपक गौर आणि हरित वसईचे प्रणेते व कामगार नेते मार्कुस डाबरे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून, अखेर या रुग्णालयाचे काम सुरू करण्यात आले आहे. आता या ठिकाणी सुरुवातीला ७० खाटांचेच रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे बांधकाम अभियंता राजेंद्र लाड यांनी सांगितले.
=============================================
८० खाटांची क्षमता
नव्याने बांधण्यात येणाऱ्या रुग्णालयाची क्षमता ८० खाटांची आहे. यातील २५ खाटा या गर्भवतींसाठी राखीव असणार आहेत. सध्या या ठिकाणी रुग्णांना जागा अपुरी पडत आहे. काही रुग्णांना खाटा नसल्याने जमिनीवर झोपावे लागत आहे; तर बाळंतीण महिलांना ही जागा अपुरी पडत असून या रुग्णालयात सध्या महिन्याला १५० ते २०० महिलांची प्रसूती होत आहे.
=====
रुग्णालयाचे बांधकाम काही तांत्रिक मुद्द्यामुळे थांबले होते; परंतु आता त्यातून मार्ग काढला असून बांधकामाला आता सुरुवात करण्यात आली आहे. लवकरात लवकर हे बांधकाम पूर्ण करण्यावर आमचा भर आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई विरार महापालिका