
नोकरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक
डोंबिवली : पेन्सिल कंपनीत नोकरीला लावतो, पेन्सिल पॅकेजचे काम देतो, असे सांगत दोघांनी कल्याणमधील महिलेची २२ हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाजमाध्यमांवर नटराज पेन्सिल कंपनीत नोकरीला लावणे, पेन्सिल पॅकेज कामासंबंधी जाहिराती केल्या जात आहेत. अशाच एका फसव्या जाहिरातीला कल्याणमधील महिला बळी पडली आहे. नटराज कंपनीत नोकरीला लावतो, असे सांगत एका भामट्याने २५ नोव्हेंबरला नीलिमा रसाळ (वय ३०) यांना संपर्क करून त्यांना बोलण्यात गुंतवून ११,९२० रुपये स्कॅनरवर पाठवण्यास सांगितले. त्यांनी ते पाठविले असता संबंधिताने कंपनीचे आयडी बनवून ते व्हॉट्सअपवर पाठवून पेन्सिल पॅकेजसाठी पाठवतो, असे सांगितले; मात्र त्यांना कोणतेही काम आले नाही. त्यानंतर शिवाणी देवी नावाच्या महिलेचा नीलिमा यांना कॉल आला. त्यांनीदेखील अशाच प्रकारे माहिती देत ९,९०० रुपये पाठवण्यास सांगितले. अशा प्रकारे कोणतेही काम किंवा जॉब न देता त्यांना २१,८२० रुपयांचा गंडा घालण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.