भाजीपाला विक्रेत्यांनी अडविले वाहतुकीचे रस्ते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजीपाला विक्रेत्यांनी अडविले वाहतुकीचे रस्ते
भाजीपाला विक्रेत्यांनी अडविले वाहतुकीचे रस्ते

भाजीपाला विक्रेत्यांनी अडविले वाहतुकीचे रस्ते

sakal_logo
By

भिवंडी, ता. ७ (बातमीदार) : भिवंडी महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी नव्याने भाजीपाला मार्केट न बांधल्याने सध्या शिवाजीनगर, ठाणगे आळी आणि तीनबत्ती परिसरात वाहतुकीच्या रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांनी ठाण मांडले असून, या मार्गावरून वाहनांना जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

भिवंडी नगरपालिका असताना नागरिकांसाठी प्रभुआळी येथे महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट बांधले होते. या मार्केटमध्ये भाजी व फळविक्रेत्यांसाठी गाळे ठेवण्‍यात आले होते. शेतकऱ्यांना दैनंदिन ताजा भाजीपाला विक्रीसाठी चौथरा बांधला होता; मात्र या सर्व मार्केटमध्ये काही व्यापाऱ्यांनी कब्जा करून गोदाम बनवले आहे. त्यामुळे घाऊक भाजीविक्रेते आणि शेतकरी महिला कासारआळी, ठाणगेआळी, शिवाजीनगर, तीनबत्ती या परिसरातील रस्त्यावर ठाण मांडले आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. तसेच रस्त्यावर दुकान मांडलेले भाजीपाला विक्रेते रस्त्यावर आपली मालकी असल्याचे सांगत असून, विविध राजकीय पुढाऱ्यांची नावे सांगत आहेत. या मार्गावर नेहमी स्वच्छता करून नवीन रस्ते व रस्त्याची दुरुस्ती करणारे पालिका प्रशासन या भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करणार आहे की नाही असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

वाहतूक कोंडी नेहमीचीच
दोन महिन्यांपूर्वी ठाणगेआळी ते मच्छीमार्केट या मार्गावर नेहमी पावसाळ्याचे पाणी साचत असल्याने व नेहमी हा रस्ता नादुरुस्त होत असल्याने तेथे दोन महिन्यांपूर्वी आरसीसी रस्ता बनवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना या मार्गावरून जाण्याची चांगली सोय झाली, परंतु या मार्गावर काही दिवसांपासून भाजीविक्रेते आणि हातगाडीवाल्यांनी कब्जा केल्याने या मार्गावर वाहने जाण्यास अडथळा निर्माण होऊन नेहमी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
नागरिकांमध्‍ये असंतोष
शिवाजीनगर ते तीनबत्ती या मार्गावर भाजीविक्रेत्यांनी खुलेआम कब्जा केल्याने दुचाकी व चारचाकी वाहने जाणे मुश्कील होऊन बसले आहे. अनेक वेळा या मार्गावरून रुग्णवाहिका जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. तरीदेखील पालिकेचे मार्केट अधिकारी व प्रभाग अधिकारी कोणतीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे नागरिकांत असंतोष पसरला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या भाजीपाला विक्रेता आणि हातगाडी मालक यांच्यावर कडक कारवाई करून हे मार्ग नागरिकांसाठी कायमचे खुले करावेत, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.
-------
ठाणगे आळी ते मच्छीमार्केट आणि शिवाजीनगर ते तीनबत्ती या मार्गावर नेहमी भाजीपाला विक्रेत्यांनी कब्जा केल्याने या मार्गावरील वाहनांची वाहतूक खोळंबली असून, भविष्यात या मार्गावर दुकाने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मार्ग पालिका प्रशासनाने नागरिकांसाठी व वाहतुकीसाठी मोकळा केला पाहिजे.
- रामदास दानवले, दक्ष नागरिक
--------------------
रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या हातगाडीचे पालिकेमार्फत सर्वेक्षण सुरू असून, त्यांच्यावर धोरणात्मक कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करून ते अतिक्रमण हटवण्याचे आदेश प्रभाग समिती क्रमांक पाचचे प्रभाग अधिकारी सुनील भोईर यांना दिले आहेत.

- दीपक पुजारी, उपायुक्त
भिवंडी-निजामपूर शहर महापालिका