मुंबई-पुणे द्रुतगतीवर शिस्तीचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-पुणे द्रुतगतीवर शिस्तीचे दर्शन
मुंबई-पुणे द्रुतगतीवर शिस्तीचे दर्शन

मुंबई-पुणे द्रुतगतीवर शिस्तीचे दर्शन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ : वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करून बेदरकार वाहने पळवणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्यातून होणारे अपघात, मृत्यूंची संख्या घटवण्यासाठी परिवहन विभाग आणि महामार्ग पोलिसांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विशेष मोहीम राबवली. १ डिसेंबरपासून सुरू झालेल्या अभियानात ७ दिवस वाहन चालकांची जनजागृती करण्यात आली. यामध्ये अतिवेगाने वाहन चालविणे, विनासिटबेल्ट, लेन कटिंग, त्याशिवाय वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मोहिमेचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहेत. अवजड वाहन त्यांच्या लेनमध्येच धावत असून, वाहनांच्या वेगालाही मर्यादा आल्याचे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दिसून येत आहे.

विशेष मोहिमेसाठी परिवहन विभागातील ३० अधिकाऱ्यांची दोन्ही महामार्गांवर नेमणूक केली असून, २४ तास नियमांबाबत जनजागृती केली जात आहे. मुंबई-पुणे दोन्ही महामार्गांवर अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे गंभीर अपघातांमध्ये यापूर्वी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. याच अनुषंगाने वाहनचालकांमध्ये नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. यात कार, जीप ही खासगी वाहने, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, टँकर, बस त्याचप्रमाणे जुन्या महामार्गावर दुचाकीस्वारांचाही जनजागृती मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर उद्यापासून (ता. ८) भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यात प्रत्येक गुन्ह्यासाठी टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाईल, असे वाहतूक विभागाने सांगितले.

गुणपत्रिका अन् शपथपत्र
मुंबई-पुणे द्रुतगतीवरील खालापूर आणि उरसे या टोलनाक्यावर समुपदेशन कक्षाची उभारणी केली आहे. वेगाने वाहन चालवणाऱ्यांना समुपदेशन केंद्रावर अतिवेगाने वाहन चालविण्याच्या दुष्परिणामांबाबत चित्रफीत दाखविण्यात येणार असून, चालकांना रस्ता सुरक्षाविषयीची प्रश्नावली सोडवावी लागणार आहे. त्याशिवाय वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथही घ्यावी लागेल. यासाठी एक विशिष्ट सॉफ्टवेअर तयार केले असून त्याचा क्यूआर कोड तयार केला आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला मोबाईलवरून क्यूआर कोड स्कॅन केल्यावर प्रश्नावलीसह शपथ उपलब्ध होईल. प्रश्नावली सोडवल्यानंतर गुणपत्रिका (प्रश्न-उत्तर) आणि शपथ घेतल्यानंतर प्रमाणपत्र लगेच उपलब्ध होणार आहे.

अपघात घटवण्याचा प्रयत्न
बोरघाटातून मुंबईच्या दिशेने खालापूर टोल नाक्यापर्यंतचा रस्ता तीव्र उताराचा असल्याने मालवाहू वाहनांचे मोठ्या संख्येने अपघात होतात. रस्ता उताराचा असल्याने वाहनचालक इंधनबचत म्हणून न्युट्रल गिअरचा वापर करतात. त्यातून हे अपघात घडत असल्याचे निदर्शनास आल्याने वाहनचालकांचे समुपदेशन आणि त्या १५ किलोमीटरच्या अंतरात एका विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यात न्युट्रल गिअरचा वापर न करणे, वेगावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरचा वापर करण्याबाबत समुपदेशन केले जात आहे.