रेपो दरात ०.३५ टक्के वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेपो दरात ०.३५ टक्के वाढ
रेपो दरात ०.३५ टक्के वाढ

रेपो दरात ०.३५ टक्के वाढ

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ ः चलनवाढी विरोधातील लढाई संपली नसल्याचे स्पष्ट करून रिझर्व बँकेच्या आर्थिक पतधोरण समितीने आज (ता.७) रेपो दरात ०.३५ टक्के वाढ केली. या वर्षातील अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दरही सात टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांपर्यंत घटवण्यात आला आहे. त्यामुळे आता रेपो रेट ५.९० टक्क्यांवरून वाढून ६.२५ टक्के झाला आहे. म्हणजेच आता गृहकर्जापासून व्यक्तिगत कर्जही महागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता जास्तीचा ईएमआय भरावा लागणार आहे.

पतधोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. अर्थव्यवस्थेच्या वाढीकडे लक्ष देताना चलनवाढ नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे असल्याने रेपो दरवाढ करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर घटवल्यानंतरही हा वेग जगातील वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी आहे, असेही दास यांनी नमूद केले. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर यावर्षीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत ४.४ टक्के तर जानेवारी ते मार्च २०२३ या तिमाहीत ४.२ टक्के राहील अशी अपेक्षा आहे. तर सन २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ७.१ टक्के तर जुलै ते सप्टेंबर २०२३ या दुसऱ्या तिमाहीत तो ५.९ टक्के राहील अशी अपेक्षाही त्यांनी वर्तवली. या आर्थिक वर्षातील ग्राहक निर्देशांक चलनवाढीचा (सीपीआय इन्फ्लेशन) दरही ६.७ टक्केच राहील, असेही त्यांनी सांगितले. नजीकच्या काळात चलनवाढ मध्यम प्रमाणात राहील मात्र ती संपलेली नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे भारतीय रुपयासह सर्व प्रमुख जागतिक चलनांची मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचे दास यांनी सांगितले. अमेरिकन डॉलरच्या वाढीच्या तुलनेत भारतीय रूपया इतर बरोबरीच्या चलनांच्या तुलनेत सर्वात कमी विस्कळित झाला. खरे तर, काही अपवाद वगळता इतर सर्व प्रमुख चलनांच्या तुलनेत भारतीय रूपया सावरलेला आहे, असेही दास यांनी सांगितले. या आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यात पहिली बैठक झाली. तेव्हा रिझर्व्ह बँकेने रेपो रेट ४ टक्क्यांवर स्थिर ठेवले होते, पण त्यानंतर लगेच २ आणि ३ मे रोजी बैठक बोलावून रेपो रेट ०.४० टक्क्यांनी वाढवून तो ४.४० टक्के करण्यात आला होता. त्यानंतर ६ ते ८ जूनला झालेल्या बैठकीत रेपो रेटमध्ये ०.५० टक्के वाढ करण्यात आली. यात रेपो रेट ४.४० वरून ४.९० टक्के केला गेला. त्यानंतर ऑगस्टमध्ये तो ५.४० टक्के झाला. सप्टेंबरमध्ये ५.९० आणि आता ६.२५ टक्के झाला आहे.

-------------
परकीय चलनसाठा ५६१ अब्ज डॉलर
दोन डिसेंबरपर्यंत देशाचा परकीय चलनसाठा ५६१.२ अब्ज अमेरिकी डॉलर एवढ्या मुल्याचा झाला आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार भारताच्या बाह्य कर्जाचे प्रमाण कमी असल्याचेही शक्तीकांत दास यांनी नमूद केले.
--------
जी २० गटाचे अध्यक्षपद ऐतिहासिक संधी
देशाची दीर्घकालीन आर्थिक क्षमता सुधारण्यासाठी हरित संक्रमण, पुरवठा व साठवण साखळ्या, पीएलआय योजना, डिजिटल बँकिंग व अर्थसेवा तसेच अन्य नवीन तंत्रज्ञान यात काम केल्यास त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेला मोठाच फायदा होईल. त्या दृष्टीने जी २० गटाचे अध्यक्षपद भारताला मिळाल्याने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मोठी भूमिका बजावण्याची नामी संधी आपल्यापुढे आल्याचेही दास यांनी सांगितले.