
ईएमआय किमान साडेपाचशेने वाढणार
मुंबई, ता. ७ ः रिझर्व्ह बँकेने रेपो दरात आज ०.३५ टक्के वाढ केल्यावर खासगी व सरकारी बँकांनी तेवढीच वाढ ग्राहकांच्या माथी मारली; तर गृहकर्जे, वाहनकर्जे आदींचा ईएमआय किमान साडेपाचशे रुपयांनी वाढण्याची भीती आहे.
देशातील बँकांना रिझर्व्ह बँक ज्या दराने कर्जे देते, त्याला रेपो दर म्हणतात. हा दर रिझर्व्ह बँकेने वाढवला की बँकांना जादा व्याजदराने निधी उपलब्ध होत असल्याने त्यांनाही कर्ज घेणाऱ्यांकडून जादा व्याज घेणे भाग पडते. त्यामुळे आता या दरवाढीमुळे कर्जेही महागतील, हे निश्चित आहे. पंचवीस लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतची वीस वर्षे मुदतीची कर्जे घेणाऱ्यांच्या ईएमआयमध्येही साडेपाचशे रुपये ते सव्वादोन हजार रुपये एवढी वाढ होऊ शकते. उदा. साडेआठ टक्के व्याजदराने २५ लाखांचे कर्ज घेणाऱ्यांचा सध्याचा हप्ता २१,६९६ रुपये असेल, तर आता तो व्याजदर ८.८५ टक्के झाल्यास हा हप्ता ५५७ रुपयांनी वाढून २२,२५३ रुपये एवढा होईल. कर्ज रक्कम जास्त असेल, तर त्या पटीतच हप्ता वाढेल. कर्ज रक्कम दुप्पट व चौपट असेल, तर हप्ताही १,११४ व २,२२८ रुपयांनी वाढेल; तर याच उदाहरणांमध्ये व्याजदर वाढल्यावरही हप्ता तेवढाच ठेवला, तर कर्जफेडीच्या मुदतीत १८ महिन्यांची वाढ होईल.
दरम्यान, भारत बिल पेमेंट सिस्टम (बीबीपीएस) मधून आता सर्व प्रकारच्या बिलांचे पेमेंट करता येईल. त्यामुळे आता मोठ्या संख्येने सामान्य तसेच व्यावसायिकांना या सोयीचा लाभ घेता येईल.