
जमीन अधिग्रहणाची नागरिकांना माहिती द्यावी
मुंबई, ता. ७ : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आणि रेवस-कारंजा पूल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे जलद वाहतूक, तसेच व्यापारउदीम, दळणवळण यांना चालना मिळणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. त्यादृष्टीने हा प्रकल्प वेळेत सुरू व्हावा आणि बाकी असलेल्या कामांसंदर्भात जमीन अधिग्रहणविषयक प्रश्न उद्भवू नयेत, यासाठी जनतेला अद्ययावत माहिती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिले.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प व रेवस-कारंजा पूल कामांच्या सद्यःस्थितीसंदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सिडको यांच्यातर्फे आज (ता. ७) विधानसभा अध्यक्ष यांच्या दालनात सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेत या प्रकल्पाचे मूळ उद्दिष्ट गाठले जावे आणि भविष्यात गर्दीच्या ठिकाणी ‘बॉटलनेक’ परिस्थिती निर्माण होऊ नये यादृष्टीने सूचना दिल्या.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प शिवडी येथे सुरू होऊन चिर्ले येथे संपतो. रेवस-कारंजा प्रकल्प सिडको द्रोणागिरीजवळ सुरू होऊन रेवसकडे जातो. रेवस-कारंजा प्रस्तावित पुलाची लांबी ८.८ किमी आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. रेवस ते रेवदंडा मार्ग विभागात जमीन खरेदी-विक्री व बांधकामाचे व्यवहार वेगात सुरू आहेत. शेतकरी आणि रहिवाशांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रस्तावित महामार्गाची आखणी, नकाशा, बाधित होणारे सर्व्हे नंबर आदींची माहिती जिल्हाधिकारी यांनी तातडीने प्रसिद्ध करावी, असे स्पष्ट निर्देश नार्वेकर यांनी दिले.