निर्देशांक पुन्हा घसरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांक पुन्हा घसरले
निर्देशांक पुन्हा घसरले

निर्देशांक पुन्हा घसरले

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी ‘एचसीएल टेक’ने या वर्षीच्या महसुलाबाबत प्रतिकूल अंदाज व्यक्त केल्यामुळे आज सर्वच आयटी शेअरची दाणादाण उडाली. त्यामुळे भारतीय शेअर बाजार निर्देशांकही अर्धा ते पाऊण टक्क्यांच्या आसपास घसरले. आज सेन्सेक्स ३८९.०१ अंश, तर निफ्टी ११२.७५ अंश घसरला.

या आर्थिक वर्षातील महसुलात घसरण होण्याची शक्यता एचसीएल टेकतर्फे वर्तवण्यात आल्यामुळे तो शेअर पावणे सात टक्के म्हणजे ७३ रुपयांनी घसरून १,०२७ रुपयांपर्यंत खाली आला. त्याचबरोबर इन्फोसिस तीन टक्के म्हणजे ५१ रुपयांनी घसरला. टीसीएस पावणे दोन टक्क्यांनी, तर विप्रो सव्वा दोन टक्क्यांनी आणि टेक महिंद्रा साडेतीन टक्क्यांनी घसरला. आज अमेरिका युरोप व आशियाई शेअर बाजार नफा दाखवीत होते. त्यामुळे सकाळी व्यवहार सुरू होताना भारतीय शेअर बाजारही नफ्यात होते. मात्र, नंतर आयटी शेअरच्या विक्रीमुळे त्यांच्यात जोरदार घसरण झाली. त्यामुळे दिवसअखेरीस सेन्सेक्स ६२,१८१.६७ अंशावर, तर निफ्टी १८,४९६.६० अंशावर स्थिरावला.

आयटी क्षेत्राच्या भीतीमुळे झालेल्या या घसरणीत आज सार्वजनिक क्षेत्राच्या बँकांच्या विक्रीची भर पडली. त्यातच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची सतत सुरू असलेली विक्री आणि आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ या मुद्द्यांची भर पडून निर्देशांकांमध्ये आणखीनच घसरण झाली. म्युच्युअल फंडांची नोव्हेंबरमधील आवक थोडीशी घटल्यामुळे नफा वसुलीला जोर चढला. गुरुवारी तोटा दाखवणारे औषध निर्मिती कंपन्यांचे शेअर, सन फार्मा, डॉक्टर रेड्डीज लॅब हे आज नफ्यात होते. आज एफएमसीजी आणि खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली. आज आयटी शेअर व्यतिरिक्त बजाज फिनसर्व सव्वा टक्का, बजाज फायनान्स एक टक्का, रिलायन्स दीड टक्का, टाटा स्टील सव्वा टक्का व अल्ट्राटेक सिमेंट दीड टक्का घसरले. डॉक्टर रेड्डीज लॅब एक टक्का, सन फार्मा व टायटन सव्वा टक्का आणि नेसले सव्वा दोन टक्के वाढले.
-----------
फेडरल बँकेच्या बैठकीमुळे सावध भूमिका
अमेरिकी फेडरल बँकेच्या पुढील आठवड्यातील बैठकीमुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यातच पुढील आठवड्यात अमेरिकेच्या चलनवाढीचा तपशीलही येणार आहे. त्यावर फेडची व्याजदरवाढीसंदर्भात भूमिका ठरेल. सध्या आयटी शेअर दडपणाखाली राहण्याची शक्यता आहे, पण मागणी वाढल्याने आणि वस्तूंच्या किमती कमी होत असल्याने एफएमसीजी शेअरचे भाव वाढतील, अशी शक्यता मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेसचे सिद्धार्थ खेमका यांनी व्यक्त केली.