
खालापूरमध्ये दहा हजार रोजगार
मुंबई, ता. ९ ः गोदरेजचा खालापूर प्रकल्प पूर्णपणे सुरू झाला की तिथे किमान दहा हजार लोकांना रोजगार मिळेल, अशी ग्वाही ‘गोदरेज अँड बॉयस’चे वरिष्ठ उपाध्यक्ष झरवन मरोलिया यांनी दिली. गोदरेज अँड बॉयसच्या खालापूर येथील प्रकल्पात त्यांनी नुकताच निवडक पत्रकारांशी संवाद साधला. सुमारे दोनशे एकर परिसरावरील हा प्रकल्प पर्यावरणपूरक असेल याकडे लक्ष दिले जात आहे. केवळ आपल्या प्रकल्पाच्या व तेथील कामगारांच्याच हिताकडे नव्हे तर पुरवठादार, एजंट आदींच्या दर्जावाढीकडेही कंपनीचे लक्ष असते. याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून शेजारच्या गावांतील आदिवासी आणि महिला यांच्या सक्षमीकरणाची मोठी कामगिरीही कंपनीने केली आहे.
पर्यावरणपूरक व स्वच्छ प्रक्रियेने उत्पादन करण्यात कंपनीने गेल्या पाच वर्षांत दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे उत्पादने बनवताना हानिकारक रसायने नसलेले रंग व अन्य साहित्य वापरणे, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, कारखान्यांमध्ये शक्यतो नैसर्गिक प्रकाशाचा वापर, छोट्या पंख्यांऐवजी अवाढव्य पंखे वापरणे आदी मार्ग आवर्जून वापरले जातात. सन २०५० पर्यंत खालापूरचा सर्व प्रकल्प पूर्णपणे प्रदूषणमुक्त होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. येथे एरोस्पेस, संरक्षण साहित्य, इंजिनिअरिंग, मटेरियल हँडलिंग आदी विभाग येणार असून विक्रोळीतील मुख्यालयातूनही येथे लक्ष ठेवता येईल, अशी व्यवस्था केली जात आहे.
---------
राजकीय संबंधांचा मुद्दाच नाही
प्रकल्प कोठे उभारावा हे ठरवताना स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांशी संबंध हा मुद्दाच नसतो. अंतर, दळणवळणाची व्यवस्था, पायाभूत व अन्य सोयी आदी गोष्टी यासाठी पाहिल्या जातात. गोदरेजचे सर्वच राज्यांमधील प्रशासनाशी उत्तम संबंध आहेत. त्यामुळे आमचे देशभर कारखाने आहेत, असेही गोदरेजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.