
सारखी टिका योग्य नाही
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : ठाकरे यांच्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे, त्यामुळे सुषमा अंधारे यांना शिवसेनेत उपनेते पद दिले गेले. टीका करण्यामध्ये त्या ॲक्टिव्ह आहेत. टीका करायला हरकत नाही; परंतु सारखी टीका करणे योग्य नाही, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना उपनेत्या अंधारे यांना देऊ केला आहे. कल्याण पूर्वेत कालच शिवसेना उपनेत्या अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा झाली. यावेळी त्यांनी सत्तेतील अनेक नेत्यांवर टीका करत त्यांचा समाचार घेतला. अंधारे या पूर्वी आरपीआय पक्षात होत्या. त्यावरून आठवले यांनी त्यांना मोलाचा सल्ला देऊ केला आहे.
रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने राज्यस्तरीय अधिवेशन कार्यक्रमाचे आयोजन कल्याणमधील आचार्य अत्रे रंग मंदिरात करण्यात आले होते. या अधिवेशनास केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी प्रश्नांना उत्तरे दिली. शिवसेना उपनेत्या अंधारे या महाप्रबोधन यात्रेत अनेक नेत्यांचा समाचार घेत आहेत, याविषयी मंत्री आठवले म्हणाले, सुषमा अंधारे यांना टीका करण्यासाठी शिवसेना पक्षात आणले आहे. त्या चांगल्या प्रवक्त्या आहेत. संघर्ष समितीत असणाऱ्या नेत्या आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी शाळा सुरू करण्याविषयी वक्तव्य केले आहे, त्यावर मंत्री आठवले म्हणाले, त्यांनी वक्तव्य केले त्याबद्दल काही माहिती नाही; परंतु डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांनी देणगी, तसेच स्वतःच्या पैशांतून शाळा सुरू केल्या होत्या. त्यांना म्हणायचे असेल की, सरकारच्या पैशांवर तुम्ही अवलंबून नाही राहिले पाहिजे. काही लोकांनी स्वतःच्या बळावर शाळा चालवल्या पाहिजेत, असे वक्तव्य त्यांनी केले असावे, भीक मागण्याचा विषय काही नाही.
शिवसेना व वंचितला इशारा
शिवसेना आणि वंचित एकत्र आले तरी फारसा काही फरक पडणार नाही. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर जर एकत्र येत असतील तर त्यांना तो अधिकार आहे. एकत्र यावे, पण त्याचा फारसा परिणाम महायुतीवर होणार नाही. आम्ही सगळे शिवशक्ती, भीमशक्ती आणि महायुती स्ट्रॉंग आहोत. मुंबईवर आमचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना कोणाला एकत्र यायचे त्यांनी यावे; परंतु आमची ताकद मोठी असून आमच्या ताकदीसमोर त्यांना नमवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आठवले यांनी शिवसेना व वंचित पक्षाला दिला.