
हॉटेलच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या आठजणांची सुटका
भाईंदर, ता.९ (बातमीदार) : ठाणे-घोडबंदर रस्त्यावर वर्सोवा भागात असलेल्या हॉटेलमध्ये लग्नासाठी आलेले आठ जण लिफ्टमध्ये दोन तास अडकल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. वर्सोवा येथील सी अँड रॉक या हॉटेलमध्ये लग्नकार्य होते. दुपारी पावणे चारच्या सुमारास हॉटेलमधील लिफ्ट्मध्ये बिघाड झाल्यामुळे ती पहिल्या व तळमजल्यादरम्यान अडकली. यावेळी लिफ्टमध्ये आठ जण होते. मिरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाने व लिफ्ट कंपनीच्या माणसांनी केलेल्या दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी सहा वाजता ही लिफ्ट तळमजल्यावर आली व आत अडकलेल्या सर्वांची सुखरूप सुटका झाली. यामध्ये अडकलेल्यांपैकी कोणालाही कसलाही त्रास झाला नाही. लिफ्ट अडकण्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माणसे झाल्यास असा बिघाड होऊ शकतो, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.