‘समृद्धी’वरील पोलिस केंद्रांचा प्रस्ताव धूळखात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘समृद्धी’वरील पोलिस केंद्रांचा प्रस्ताव धूळखात
‘समृद्धी’वरील पोलिस केंद्रांचा प्रस्ताव धूळखात

‘समृद्धी’वरील पोलिस केंद्रांचा प्रस्ताव धूळखात

sakal_logo
By

प्रशांत कांबळे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (ता. ११) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या ५२० किलोमीटर नागपूर-शिर्डी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले जाणार आहे. एकूण ७०१ किलोमीटरच्या महामार्गावर २४ पोलिस केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यासाठी एकूण ८६४ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मागणीचा प्रस्ताव महामार्ग पोलिस विभागाने राज्य सरकारकडे पाठवला आहे; मात्र गेल्या एक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.

समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्त स्थिती, वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी महामार्ग पोलिसांची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकारने महामार्ग पोलिसांकडून मनुष्यबळाचा प्रस्ताव मागितला होता. ११ डिसेंबरला महामार्ग सुरू झाल्यानंतर वाहतूक नियमनाचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. अद्याप टोल नाके सुरू झाले नसल्याने स्थानिकांकडून नियमबाह्य वाहतूकही समृद्धी महामार्गांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग खुला करण्यापूर्वी महामार्ग पोलिसांच्या मनुष्यबळाच्या मागणीच्या प्रस्तावाला राज्य सरकराने अंतिम मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे.

महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने तयारी केली आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसली, तरी आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ आणि सर्व व्यवस्था असल्याने नियमित स्वरूपाच्या सुरक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.
- कुलवंत कुमार सारंगल, अपर पोलिस महासंचालक (वाहतूक विभाग, महाराष्ट्र राज्य)

केंद्रासाठी आवश्यक साधनसामुग्री
साधनसामुग्री - नग संख्या
चारचाकी वाहने प्रत्येकी ०१ २४
मोटरसायकल प्रत्येकी ५ १२०
बिनतारी संच (स्थायी) प्रत्येकी २ ४८
बिनतारी संच (चलत) प्रत्येकी १ २४
दूरध्वनी संच प्रत्येकी २ ४८
संगणक, प्रिंटर प्रत्येकी २ ४८
स्कॅनर प्रत्येकी १ २४