
बेस्टच्या प्रीमियम बससेवेला मुहूर्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबईत वर्षभरापासून चर्चेत असलेल्या प्रीमियम बस सेवेची प्रतीक्षा आता संपली आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात चार प्रीमियम बसेस दाखल झाल्या आहेत. ठाणे ते बीकेसीदरम्यान देशातील पहिली इलेक्ट्रिक वातानुकूलित बस धावणार आहे. त्यामुळे सोमवारपासून (ता. १२) प्रवाशांना लक्झरी प्रवास करता येणार आहे.
नव्याने चलो अँप डाऊनलोड करणाऱ्या प्रवाशांना ठाणे - बीकेसी दरम्यान १०० रुपयांत पहिल्या पाच फेऱ्या प्रवास करता येणार आहे. वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पहिल्या पाच फेऱ्यांचा प्रवास १० रुपयांत करता येणार आहे. विशेष म्हणजे प्रवासी ज्या ठिकाणांहून तिकीट बुक करणार, त्या ठिकाणांहून प्रवाशाला प्रवास करता येणार आहे.
प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बेस्टकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. बेस्ट उपक्रमाने प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात चार बसेस दाखल झाल्या आहेत; तर लवकरच २०० प्रीमियम बसेस दाखल होतील. या बससेवेची वैशिष्ट्ये म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे, पुश बॅक सीट्स, सीट्ससमोर लॅपटॉप ठेवण्यासाठी जागा, वातानुकूलित, यूएसबी चार्जर सुविधा मिळणार आहे.
अशी असणार बससेवा
ठाणे ते बीकेसी जलद मार्ग
ठाणे येथून सकाळी ७, ७.३०, ८ व ८.३० वाजता बस सुटणार असून बीकेसी येथून संध्याकाळी ५.३०, ६, ६.३० व ७ वाजता सुटणार आहे.
संपूर्ण दिवस बससेवा
वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी दरम्यान धावणारी प्रीमियम बससेवा बीकेसी येथून सकाळी ८.५० व संध्याकाळी ५.३९ वाजता सुटेल; तर वांद्रे स्थानक पूर्व येथून सकाळी ९.२५ वाजता व संध्याकाळी ६.२५ वाजता सुटणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
तिकीट दर
वांद्रे स्थानक ते बीकेसी ५० रुपये
ठाणे - बीकेसी २०५ रुपये