
राज्यात अवकाळी पावसाचा शक्यता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. हवामान विभागाने याला ‘मंदोस चक्रीवादळ’ असे नाव दिले असून ते तमिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याचा परिणाम मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागांवर होणार असून अवकाळी पावसाची शक्यताही राज्यात वर्तवण्यात आली आहे.
मंदोस चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याने त्याचा परिणाम आसपासच्या १३ जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या किनारपट्टीवरील १३ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या दरम्यान पावसासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ६५ ते ८५ किलोमीटर प्रतितास राहणार आहे.
मंदोस चक्रीवादळाचा परिणाम मुंबई आणि ठाणे जिल्ह्यावरही होणार आहे. साधारणतः सोमवारी (ता. १२) या भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाजदेखील आहे. १२ ते १५ डिसेंबरदरम्यान अनेक भागांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तमिळनाडूसह मंदोस चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांनाही बसणार आहे. राज्यात कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता आहे. हे चक्रीवादळ दक्षिण-पश्चिम आखातावर चक्रीवादळ सरकत असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी नागापट्टिनम आणि तंजावर तसेच चेन्नई आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
..........