
खारघरची कोंडीतून लवकरच सुटका
खारघर, ता. १० (बातमीदार) : नवी मुंबईतील सुनियोजित शहरांपैकी एक असलेल्या खारघर शहरात वाहन पार्किंगची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने सिडकोने ग्रामविकास भवनकडून प्राईम मॉलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला तीन मीटरचा सेवा रस्ता आणि उर्वरित जागेवर वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
सिडकोने खारघर शहर निर्माण करताना सीबीडी ते तळोजादरम्यान ३२ मीटरचा रस्ता तयार केला. ग्रामविकास भवनकडून उत्सव चौककडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणात मोठमोठी झाडे असल्यामुळे हा परिसर हरितपट्टा म्हणून ओळखला जातो. रस्त्याच्या कडेला काही बांधकाम व्यावसायिकांनी इमारत उभी करून मोकळ्या जागांवर अतिक्रमण केले आहे; तर काहींनी मोकळ्या जागेत वाहनविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे या जागेवर सर्व्हिस कॉरिडॉरची मागणी होत होती. सिडकोने याप्रकरणी सर्वेक्षणदेखील केले होते. मात्र, कोरोनाकाळात या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले होते. त्याचा परिणाम म्हणूनच खारघर परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढल्याने खारघरचे तत्कालीन वाहतूक अधिकारी प्रवीण पांडे यांनी सिडकोने नकाशात नमूद केल्याप्रमाणे सर्व्हिस कॉरिडॉरची मागणी केली होती. सिडकोने ही मागणी अखेर मान्य केली असून तीन मीटरचा सेवा रस्ता आणि उर्वरित जागेवर वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
-----------------------------
वाहनतळाचे कामकाज पाहणाऱ्या अभियंताला घटनास्थळी पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. रस्त्याचा कडेला मोठ्या प्रमाणात सिडकोची जागा असून या जागेत वाहनतळ उभारला जाणार आहे.
- गीता पिल्ले, वरिष्ठ अधिकारी, ट्रान्स्पोर्ट विभाग, सिडको