
यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, कष्ट महत्त्वाचे
बोईसर, ता. ११ (बातमीदार) : अलीकडे मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. मुलांकडेसुद्धा खूप क्षमता आहे; मात्र त्या क्षमतेचा योग्य तो उपयोग करणे गरजेचे आहे. समाजातील आर्थिक परिस्थिती बदलायची असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आपल्याबरोबरच आपल्या आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी व कष्ट करण्याची तयारी ठेवा, असा सल्ला प्रख्यात वक्ते गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे शुक्रवारी पालघर येथील आर्यन हायस्कूलच्या मैदानावर विद्यार्थ्यांना ‘भविष्यावर बोलू काही’ मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात प्रख्यात वक्ते गणेश शिंदे यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले. या वेळी शिंदे यांनी सांगितले की, आयुष्याची मजा घ्या. अभ्यासासाठी मात्र सदैव एकरूप व्हा. विद्यार्थी मित्रहो मोठी स्वप्न बघा व त्याचे नियोजन करून ती साकार करण्याचा प्रयत्न करा.
या मार्गदर्शन व्याख्यानाच्या प्रारंभी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या ॲड. कीर्ती भोईर, सुजय जाधव, वैभव म्हसणे, अर्जुन तांडेल, यांनी मार्गदर्शन केले. या वेळी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक प्रमोद पाटील, पालघरच्या नगरसेविका गीता संखे, रोहिणी अंभुरे, भगिनी समाज विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता वर्तक, आर्यन हायस्कूलचे मुख्याध्यापक गावित तसेच विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरेश्वर नाईक यांनी केले.