चिरनेरमधील महागणपतीच्या दर्शनासाठी रीघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिरनेरमधील महागणपतीच्या दर्शनासाठी रीघ
चिरनेरमधील महागणपतीच्या दर्शनासाठी रीघ

चिरनेरमधील महागणपतीच्या दर्शनासाठी रीघ

sakal_logo
By

उरण, ता. ११ (वार्ताहर)ः संकष्टी चतुर्थीनिमित्ताने रविवारी (ता. ११) हजारो भाविक चिरनेर गावातील श्री महागणपतीच्या चरणी नतमस्तक झाले. त्यात नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, पेण व उरण येथील भक्तांसोबत तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमधील उमेदवारांबरोबर, कार्यकर्तेदेखील आघाडीवर होते.
उरण तालुक्यातील चिरनेर गाव विविध कारणांमुळे लोकप्रिय आहे. १९३० मध्ये ब्रिटिश सरकारविरोधात झालेल्या स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनात येथील गावकऱ्यांनी हौतात्म्य पत्करले होते. तसेच गावात असणारा महागणपती अनेकांचे ग्रामदैवत आहे. त्यामुळे श्रद्धास्थान असलेल्या या गणेशाची ख्याती सर्वदूर पसरली आहे. त्यामुळे गणेशाच्या दर्शनाला व हुतात्म्यांच्या बलिदानातून पावन झालेल्या भूमीचे दर्शन घेण्यासाठी नेहमीच येथे भाविकांची गर्दी असते. अशातच या वर्षातील शेवटच्या संकष्टी चतुर्थी निमित्ताने रविवारच्या सुट्टीचा योग साधत उरण, पनवेल, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पेणमधील शेकडो भाविक श्रींच्या चरणी नतमस्तक झाले. या वेळी तालुक्यातील १७ ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी ये- जा करत असल्याचे चित्र होते; तर मंदिरातील श्रींचा अभिषेक सोहळा, काकड आरती, भजन आदी कार्यक्रमांमुळे वातावरण भक्तिमय झाले.
-----------------------------
शिलाहार राजवटीतील मंदिर
शिलाहार राजवटीतील महागणपतीचे हे मंदिर तत्कालीन मुस्लिम आक्रमकांनी उद्ध्वस्त केले होते; मात्र गणेशभक्तांनी महागणपतीची मूर्ती मंदिराजवळील तलावात सुरक्षित लपवून ठेवली होती. तद्नंतर पेशव्यांचे सरदार रामजी महादेव फडके यांना दृष्टांतानंतर तलावाचे खोदकाम करून या मूर्तीची भव्य पाषाणी मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिरालातील गणेशाची मूर्ती चतुर्भुज, शेंदूर चर्चित तसेच पद्मासनात बसलेली आहे.