शॉर्टकट बेतला जिवावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शॉर्टकट बेतला जिवावर
शॉर्टकट बेतला जिवावर

शॉर्टकट बेतला जिवावर

sakal_logo
By

विक्रम गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील गोवंडी ते पनवेल आणि रबाळे ते जुईनगर या दोन्ही मार्गांवर गेल्या ११ महिन्यांत झालेल्या अपघातांत २०० जणांचा बळी गेला आहे. यात सर्वांत जास्त अपघात हे रूळ ओलांडताना झाले आहेत. त्यामुळे लोकल पकडण्यासाठी शॉर्टकट मारण्याची सवय अनेकांच्या जिवावर बेतली आहे.
हार्बर आणि ट्रान्स हार्बर या रेल्वे मार्गांवरील गोवंडी ते पनवेल आणि रबाळे ते जुईनगर या रेल्वे मार्गावरून रेल्वे रूळ ओलांडून जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या मार्गावर दोन दिवसाआड एका प्रवाशाचा मृत्यू होतो. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांमध्ये तर या दोन्ही रेल्वे मार्गांवर जवळपास २०० जणांचा मृत्यू झाला आहे. यात जवळपास १०८ जणांना रेल्वे रूळ ओलांडताना जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे मानखुर्द-गोवंडी, सानपाडा, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे, नेरूळ, खारघर, पनवेल येथे नागरिक मोठ्या प्रमाणात रूळ ओलांडून जात असल्याचे अपघातांच्या या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. त्याखालोखाल धावत्या लोकलमधून पडून ४१ जणांचा मृत्यू झाला असून नैसर्गिक मृत्यू, आजारपणामुळे, हार्ट ॲटॅकमुळे व इतर कारणांमुळे ३७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
--------------------------
अपघात झालेले मृत्यू ः २००
मृत पुरुषांची संख्या ः १७१
मृत महिलांची संख्या ः २२
जखमी ः १३२
बेवारस मृतदेह ः ५२
---------------------------
अपघात होण्याची कारणे
- रेल्वे रूळ ओलांडणे, धावत्या लोकलमधून पडणे, रुळाजवळील खांब लागणे, फलाट आणि लोकलमधील अंतरामध्ये पडणे, लोकलच्या छतावरू नप्रवास करताना विजेचा धक्का लागणे ही रेल्वे अपघातांची प्रमुख कारणे आहेत. शिवाय, स्थानकाच्या एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी पुलाचा, जिन्यांचा वापर न करता प्रवासी रूळ ओलांडून जात असल्याने गाडीच्या वेगाचा अंदाज न आल्याने अपघात होतो.
- कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांचा अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवाय रेल्वे प्रशासनाकडून भिंत बांधून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र तरीदेखील रेल्वे रुळावरून जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींना आवरायचे कसे, असा प्रश्न रेल्वे पोलिसांसह आरपीएफला पडला आहे.
-------------------------------
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी जीआरपी आणि आरपीएफकडून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यावर नियमित कारवाया करण्यात येतात. तसेच महिला सुरक्षिततेच्या दृष्टीनेदेखील विविध उपाययोजना केल्या गेल्या आहेत. अनेक ठिकाणी रेल्वे रूळ ओलांडताना अपघात होतात. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे पुलाचा वापर करावा.
- संभाजी कटारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाशी रेल्वे पोलिस ठाणे