
सावरेमध्ये ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम
मनोर, ता. ११ (बातमीदार) : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत पालघर तालुक्याच्या पूर्व भागातील दुर्गम भाग असलेल्या सावरे एम्बुर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सावरे वाणी पाडा येथील सभागृहात महिला आणि ग्रामस्थांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पंचायत समितीच्या सभापती शैला कोळेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमाला पंचायत समितीच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी गावच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. घरकुल योजनेतून ९९ लाभार्थ्यांना घरे मंजूर झाली असून एका घरकुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन सभापती शैला कोळेकर यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले.
सावरे एम्बुर जिल्हा परिषद गटातील सावरे गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले, त्यातून काही विकास कामे मार्गी लागली, तर प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असून दुर्गम भाग असल्याने सावरे एम्बुर भागाच्या विकासासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे करण्यात आली आहे. सावरे जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी दोन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी निधी मंजूर करून बांधकाम पूर्ण केले आहे. येत्या काळात अतिरिक्त वर्गखोल्या बांधून मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सावरे एम्बुर भागाच्या सर्वांगीण विकासासाठी नव्याने रस्ते निर्मिती, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारून आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगत योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या सदस्या विनया पाटील यांनी केले. या वेळी पंचायत समिती सदस्य दिलीप पाटील, माजी उपसभापती, मेघन पाटील, सावरे एम्बुर ग्रामपंचायतीचे सरपंच सुदर्शन वनगा, माजी सरपंच विकास पाटील, गटविकास अधिकारी रवींद्र रेवंडकर, विस्तार अधिकारी अमृत उमतोल, रूपाली धुमाळ, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.