अनास्थेचा उद्यानाला फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनास्थेचा उद्यानाला फटका
अनास्थेचा उद्यानाला फटका

अनास्थेचा उद्यानाला फटका

sakal_logo
By

नेरूळ, ता. ११ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिकेने नेरूळ येथे बांधलेल्या रॉक गार्डनची दयनीय अवस्था झाली आहे. या उद्यानात पैसे घेऊन प्रवेश दिला जात आहे; मात्र असे असताना उद्यानातील साहित्य नादुरुस्त असल्याने बच्चे कंपनीसह नागरिकांमधून पालिकेविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.
नेरूळ येथे विस्तीर्ण अशा जागेत पालिकेने रॉक गार्डन उभारले आहे. या रॉक गार्डनमध्ये पाच वर्षांपुढील मुलांसाठी तीन रुपये; तर प्रौढांसाठी पाच रुपये शुल्क आकारले जाते. हिरवाईने नटलेल्या या गार्डनमध्ये प्राण्यांचे चित्रशिल्प, लहान मुलांसाठी प्ले-गाऊंड, प्रेक्षणीय स्थळे, ॲम्पिथिएटर आहे. प्रेक्षणीय स्थळांमधील मंकी पॉइंट व धबधबा असणाऱ्या शिल्पाचा रंग उडालेला असून, दुसरीकडे तलावात पाण्याअभावी शेवाळ आलेले आहे. या उद्यानात राष्ट्रीय उद्यानाच्या धर्तीवर हरीण व काळविटांची शिल्पे उभारण्यात आली आहेत; मात्र शिंगे तुटलेल्या अवस्थेत असून दीपस्तंभातील छतातून पाणी गळत असल्याने प्लास्टिक टाकण्याची नामुष्की पालिकेवर आली आहे. याशिवाय लहान मुलांसाठी असलेला झोपळा, घसरगुंडी हे साहित्य अनेक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे.
---------------------------
रोषणाई बंद असल्याने गैरसोय
या गार्डनमध्ये खेळांच्या साहित्याबरोबरच राशीची माहिती देणारे राशीचक्रस्थळ उभारण्यात आलेले आहे; मात्र राशींची माहिती देणाऱ्या पाट्यांचा रंग उडाल्याने पांढऱ्या पडल्या आहेत. तसेच रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाई बंद असल्याने सूर्य मावळण्याच्या पूर्वीच या उद्यानातून काढता पाय घ्यावा लागत आहे.
---------------------------
कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया
मुलांसाठी खास आकर्षक असणारी टॉय ट्रेन कित्येक दिवस बंदमुळे लहान मुलांना आकर्षण वाटणारे टॉय ट्रेन चालू करण्यात यावी, अशी मागणी लोकांची आहे. पैसे घेऊनही या ठिकाणी योग्य प्रकारे सुविधा मिळत नसल्याने पालकवर्गाने आणि नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उद्यानांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या महापालिकेला माहितीपर उपक्रमांची झालेली दुरवस्था दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
---------------------------
लहान मुले सुट्टी असली की रॉक गार्डनला जाण्याचा हट्ट करतात, परंतु येथील टॉय ट्रेन बंद असल्यामुळे मुलांचा हिरमोड होत आहे.
- जितेंद्र पवार, नागरिक
----------------------
उद्यानातील आकर्षक अशी आदिवासी लोकांची गुहा, हत्यारांचे अवशेष नाहीसे झाले आहेत. खेळण्याचे साहित्यदेखील तुटलेले आहे. यामुळे मुलांना लागण्याची भीती आहे.
- शोभा देठे, महिला