उमटे धरण होणार गाळमुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमटे धरण होणार गाळमुक्त
उमटे धरण होणार गाळमुक्त

उमटे धरण होणार गाळमुक्त

sakal_logo
By

प्रमोद जाधव : सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. ११ ः सतत जलवाहिनीला गळत, शुद्धीकरणाचा अभाव, कमी दाबाने येणारे पाणी, गाळ न काढल्याने साठवण क्षमता कमी, गाळयुक्‍त पाणी अशा अनेक समस्यांमुळे उमटे धरण नेहमीच चर्चेत राहिले आहे. उमटे धरणावर अवलंबून अलिबाग तालुक्यातील ६३ गावांमधील ४२ हजार नागरिक आजही तहानलेल्‍या स्थितीत आहेत. मात्र लवकरच धरणातील गाळ काढण्यापासून जलवाहिनी बदलण्याची अनेक कामे केली जाणार आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत हे काम केले जाणार आहे. त्यामुळे उमटे धरण गाळमुक्त होऊन परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

उमटे धरणाची निर्मिती १९७८ मध्ये करण्यात आली. साठवण क्षमता ८७ दशलक्ष घनफूट आहे. पाण्याची शेवटची पातळी ४० मीटर, धरणाची उंची ५६.४० मीटर आहे. ४० वर्षे जुने धरण १९९५ मध्ये जीवन प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत धरणाच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जात आहे. धरणातील पाणीपुरवठ्यावर ४० टक्के गावे अवलंबून आहेत. उमटे धरणातून ६३ गावे, वाड्यांमधील साधारणत: ४२ हजारांहून अधिक नागरिकांची तहान भागवली जाते. मात्र धरणातील गाळ काढण्यात न आल्‍याने अनियमित, गढूळ पाणी पुरवठ्याच्या तक्रारी ग्रामस्‍थांकडून वाढल्‍या आहेत.
धरण परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे, मात्र तरीही नागरिकांना शुध्द पाणी पुरवठा होत नसल्‍याची ओरड कायम आहे. धरणातील जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागल्‍याने काही गावांना दोन ते तीन दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागते.
धरणावर अवलंबून काही गावांत तर एप्रिलपासूनच पाणी टंचाई सुरू होते. त्यामुळे पुरवठा विभागावर पाणी कपातीची वेळ आली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून आठवड्यातून एक दिवस पाणी कपात सुरू केली आहे. तर जानेवारीपासून दोन दिवस पाणी कपात होण्याची शक्यता आहे.
आमदार महेंद्र दळवी यांनी नागरिकांच्या समस्यांचे गांभीर्य ओळखून उमटे धरणातील गाळ काढण्यापासून जलवाहिनी बदलणे व मजबुतीकरणासाठी सरकारकडे निधीची मागणी केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत हे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. त्याची निविदा लवकरच मागविण्यात येणार आहे.

लाखो रुपये पाण्यात
उमटे धरणावर अवलंबून नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा, यासाठी गाळ काढण्यासाठी जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाची मदत घेत गाळ काढण्याची मोहीम २४ मे २०२१ रोजी सुरू केली होती. पंधरा दिवसांत गाळ काढण्याचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून इंधनाचा खर्च म्हणून २५ लाखांची तरतूद केली होती. जलसंपदा विभागाने गाळ काढण्यासाठी वापरलेले साहित्यांसाठी दहा लाख रुपये खर्च आला. त्यानंतर दोन जूनला जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या वेळी ३० टक्के गाळ काढला होता. मात्र पावसामुळे काम थांबविण्यात आले. त्यानंतर दीड वर्षांत पुन्हा कामाला सुरुवात करण्यास जिल्हा परिषद विभाग उदासीन ठरले. त्यामुळे जिल्हा परिषदेने गाळ काढण्यासाठी केलेला लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

उमटे धरणातून सुडकोलीपासून नागाव परिसरातील शेकडो गावांना पाणी पुरवठा होतो. नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत धरणाच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. तशी निविदा काढण्याच्या सुचनाही केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळेल, अशी आशा आहे.
- महेंद्र दळवी, आमदार, अलिबाग

उमटे धरणातील मजबुतीकरण, लाईन चेंज करणे आदी कामे केली जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत हे काम केले जाणार आहे. त्यामुळे पुरेशी माहिती उपलब्ध नाही.

- संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, रायगड

धरणावर दृष्टीक्षेप
निर्मिती - १९७८
साठवण क्षमता - ८७ दशलक्ष घनफूट
उंची - ५६.४० मीटर
पुरवठा होणाऱ्या ग्रामपंचायती - १२
देखभाल दुरुस्तीचे काम - रायगड जिल्हा परिषद, ग्रामीण पाणी पुरवठा