अवकाळी पावसाचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवकाळी पावसाचा धोका
अवकाळी पावसाचा धोका

अवकाळी पावसाचा धोका

sakal_logo
By

अलिबाग, ता. ११ (बातमीदार) ः नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅन डौंस चक्रीवादळ तयार झाल्याने समुद्र खवळणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये येत्या पाच दिवसांत मेघगर्जनेसह मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. किनारी राहणाऱ्या नागरिकांसह, मच्छीमारांना तसेच जिल्ह्यातील शेतकरी, वीटभट्टी व्यावसायिकांना अवकाळी पावसाचा धोका असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
जिल्ह्यामध्ये थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. थंडीपासून बचावासाठी अनेकजण उबदार कपड्यांचा वापर करण्यावर भर देत आहेत. मात्र हवामान विभागाच्या सूचनेनुसार, रायगड जिल्ह्यामध्ये ऐन थंडीत विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह वादळी वारे व मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता वर्तवली जात आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये. विद्युत उपकरणांपासून दूर राहावे, जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे, फळे, भाजीपाला, शेत पिकांची सुरक्षीत ठेवण करावी. रचून ठेवलेली भाताची उडवींचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, अशा सूचना रायगड जिल्हा प्रशासनाने दिल्‍या आहेत.

संपर्क साधण्याचे आवाहन
जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांसह नागरिकांनी सतर्क राहावे, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाच्या ०२१४१- २२२०९७, २२२११८, ८२७५१५२३६३ व टोल फ्री क्रमांक ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पूर्व किनारपट्टीवर वादळ येण्याची, हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा शक्‍यता आहे. त्यामुळे किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना मच्छीमारांना दिल्‍या आहेत. तालुका पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
- सागर पाठक, अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, रायगड

जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार, खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना मच्छीमारांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय आपत्‍कालीन यंत्रणाही सतर्क आहे.
- संजय पाटील, साहायक आयुक्त
मत्स्य व्यवसाय विभाग, रायगड