उंबर्डेचे सौंदर्य खुलणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उंबर्डेचे सौंदर्य खुलणार
उंबर्डेचे सौंदर्य खुलणार

उंबर्डेचे सौंदर्य खुलणार

sakal_logo
By

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : हिरवाईने नटलेला परिसर, आजूबाजूला तुरळक वस्ती आणि शहराच्या कोलाहलापासून सुटका करणारी शांतता... असा काहीसा कल्याण पश्चिमेतील उंबर्डे तलावाचा परिसर आहे. या तलावाचे सौंदर्य आणखी खुलवून एक पर्यटनाचे छानसे केंद्र बनविण्यासाठी प्रशासन क्रियाशील असून केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत या तलावाचा कायापालट करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने १३ कोटी रुपयांचा विकास आराखडा सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. सरकारची मंजुरी येताच तलावाचे काम हाती घेण्यात येणार आहे. नवे कल्याण शहर हे खाडीकिनारी वसू पाहत असून, खाडीकिनारी भागात असलेला उंबर्डे तलाव त्यातीलच एक आहे. या ठिकाणी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध केल्यास नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी छानसे ठिकाण शहरांतर्गत भागात उपलब्‍ध होणार आहे.

ठाणेपाठोपाठ कल्याण हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. कल्याण-डोंबिवलीत आजच्या घडीला सात मोठे तलाव आहेत. यातील काळा तलावाचे स्मार्ट सिटीअंतर्गत सुशोभीकरण केले जात आहे; तर उंबर्डे तलावाचेही सुशोभीकरण केले जाणार आहे. चार-पाच वर्षांपूर्वी केंद्र सरकारने केडीएमसी हरित क्षेत्र विकासकामाला मंजुरी देत दोन कोटी रुपयांचा निधी पालिकेला दिला होता. यातून उंबर्डे येथील १० एकर जागेवर मानवनिर्मित घनदाट जंगल साकारले गेले आहे. घनदाट जंगल भोवतालची जागा ही वळणावळणाची असल्याने या ठिकाणी सायकल ट्रॅक उभारणीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यासोबतच बाजूलाच नैसर्गिक पाण्याचे स्रोत असलेला उंबर्डे तलाव आहे. या तलावाचे सुशोभीकरण करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. कोरोना कालखंड यामुळे या कामास विलंब झाला असला, तरी आता प्रशासन जोमाने कामाला लागले आहे. तलाव सुशोभीकरणाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून तो सध्या मंजुरीसाठी सरकारकडे पाठविण्यात आला आहे. १३ कोटींचा हा विकास आराखडा असून, त्यानुसार तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. सरकारकडून या आराखड्याची छाननी सुरू असून, लवकरच हे काम पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली.
----------------------------------------
बोटिंगची सुविधा सुरू होणार
तलावाच्या मधोमध विहीर आहे. उन्हाळ्याच्या दिवसांतही विहिरीतील पाण्याचे झरे जिवंत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या पडक्या स्वरूपातील विहिरीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तलावाच्या जागेत अतिक्रमण होऊ नये म्हणून संरक्षित भिंत बांधण्यात येणार आहे. तलावातील गाळ काढणे, पाणी स्वच्छता, हरित क्षेत्र विकसित करणे, पायवाट, गणेश घाट, लाईट आदी स्वरूपाची कामे पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहेत. निसर्गरम्य हा परिसर असल्याने बोटिंगची सुविधा सुरू करण्याचादेखील मानस असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
---------------------------------
तलाव परिसर
तलाव पाण्याने तुडुंब भरलेला असून तलावाचे पाणी स्वच्छ आहे. पाण्यात विविध जातीचे मासे, कासवे, साप यांचे वास्तव्य आढळते.

परिसरात शांतता असल्याने आजूबाजूच्या भागातील नागरिक येथे सकाळ, संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी येतात; परंतु हे प्रमाण तुरळक आहे.
-------------------------------------
केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत उंबर्डे तलावाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्याविषयीचा विकास आराखडा तयार करत तो सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. मंजुरी येताच तलाव सुशोभीकरण कामास सुरुवात करण्यात येईल.
- अर्जुन अहिरे, शहर अभियंता, केडीएमसी
-------------------------------------------

उंबर्डे तलाव माहिती
एकूण क्षेत्रफळ - १९ हजार ८०३ स्‍क्‍वेअर मीटर
पाणलोट क्षेत्रफळ - १८ हजार ६५८.५६ स्‍क्‍वेअर मीटर
-------------------------------------
तलाव सुशोभीकरणसाठी निधी
सरकारकडून मंजूर निधी - १४.६४ कोटी रुपये
प्रत्यक्ष प्राकलन रक्कम - १२.९१ कोटी रुपये
--------------------------------------------------
कचऱ्याच्‍या दुर्गंधीचा अडसर
उंबर्डे परिसर हा शांत निसर्गरम्य परिसर आहे. यामुळे या ठिकाणी हरित क्षेत्र विकसित करत तलावाच्या ठिकाणी पर्यटन केंद्र बनवण्याचा विचार पालिका प्रशासन करत आहे. मात्र, तलावापासून काही अंतरावर केडीएमसीचा उंबर्डे घनकचरा विघटन प्रकल्प आहे. या ठिकाणी कचरा मोठ्या प्रमाणात साठवला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. ही दुर्गंधी तलाव परिसरातदेखील जाणवते. भविष्यात तलावाचे सुशोभीकरण करत नागरिकांसाठी चांगले पर्यटन केंद्र उंबर्डे तलावाकाठी उभारले गेले, तरी कचऱ्याची दुर्गंधी त्याला अडसर ठरू नये, अशी अपेक्षा नागरिक व्‍यक्‍त करत आहेत.