
आवक वाढल्याने फळांच्या दरात घसरण
वाशी, ता. ११ (बातमीदार) ः थंडीचा हंगाम सुरू झाल्याने पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अशातच यंदा फळांचे चांगले उत्पादन आले आहे. परिणामी, नवी मुंबईच्या फळ बाजारात कलिंगड, टरबूज आणि पपईची आवक वाढली आहे.
घाऊक बाजारात सध्या सोलापूर, नगरमधून कलिंगड, टरबूज आणि पपईची दररोज आवक होत आहे. यंदा पिकाला चांगले पाणी, हवामान मिळाले असल्याने बाजारातील फळांची आवक वाढली आहे. त्यामुळे आवक जास्त असल्याने फळांचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. घाऊक बाजारात कलिंगड नऊ ते १२ रुपये किलो, टरबूज १८ ते २५ रुपये किलो आणि पपई २५ ते ३० रुपये किलो आहेत; तर आणखी काही दिवस अशीच आवक राहिल्यास हे दर आणखी खाली येण्याची शक्यता व्यापारी अशोक उंडे यांनी व्यक्त केली आहे.
-------------------------------------
उपवासामुळे अधिक मागणी
ऊन वाढायला सुरुवात होत आहे. त्यामुळे फळांना मागणी वाढत आहे. तसेच मार्गशीष महिना हा उपवासाचा महिना असल्याने सध्या फळांना अधिक मागणी आहेच.