वसई-विरार शहरात मॅरेथॉनचा ‘फिव्हर’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई-विरार शहरात मॅरेथॉनचा ‘फिव्हर’
वसई-विरार शहरात मॅरेथॉनचा ‘फिव्हर’

वसई-विरार शहरात मॅरेथॉनचा ‘फिव्हर’

sakal_logo
By

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. ११ : वसई-विरार शहर महापालिकेतर्फे रविवारी पार पडलेल्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमुळे संपूर्ण शहराला मॅरेथॉनचा ‘फिव्हर’ चढला असल्याचे चित्र दिसून आले. या स्पर्धेत देशभरातून धावपटूंचा मोठा सहभाग दिसून आला. या वेळी जल्लोष, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते; तर धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेत्यांनी हजेरी लावत मॅरेथॉनमध्ये दौड लावली, तर ज्येष्ठांपासून ते अगदी बच्चेकंपनीने हिरिरीने सहभाग घेतला.
गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली नव्हती; मात्र यंदा उत्साहात ही स्पर्धा पार पडली. पहाटेचा थंडीचा वारा, खुले रस्ते आणि स्पर्धकांमधील चढाओढ यामुळे वसई-विरारमधील वातावरण मॅरेथॉनमय झाले होते. या वेळी धावपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी वसई, नालासोपारा व विरार शहरात नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच शाळेचे विद्यार्थी हातात झेंडा घेऊन स्पर्धकांना धावण्यासाठी ऊर्जा देत होते. अभिनेते जयवंत वाडकर, पुष्कर श्रोत्री, समीर चौगुले, अरुण कदम, प्रभाकर मोरे यांच्यासह अन्य कलाकारांनी ७० मीटर धाव पूर्ण करत आनंद घेतला. ठिकठिकाणी धावपटूंना पाण्याची, एनर्जी ड्रिंकची व्यवस्था करण्यात आली होती. कोणत्याही स्पर्धकाला इजा झाल्यास ओषधोपचार तातडीने मिळावे म्हणून दवाखाने, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती; तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
--------------
काय म्हणतात कलाकार
वसई-विरार मॅरेथॉन एक नवी ऊर्जा निर्माण करत असते. महत्त्वाचे म्हणजे काही स्पर्धकांनी वेळेच्या अगोदर धाव पूर्ण केली, हे कौतुकास्पद आहे. आपले आरोग्य सुदृढ असेल, तर सर्व काही शक्य आहे. रात्रंदिवस चित्रीकरणात व्यग्र असलेल्या कलाकारांनी चालणे, धावणे आणि व्यायाम करणे यासाठी वेळ राखून ठेवावा. आरोग्याची हेळसांड करू नये. स्पर्धकांचा वाढता प्रतिसाद तरुणांना प्रेरणा देणारा आहे.
- पुष्कर श्रोत्री, अभिनेता
----
आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष दिले जात नाही. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यात वसई-विरार महापालिका, आमदार हितेंद्र ठाकूर हे मॅरेथॉनसाठी प्रयत्न करून देशातील नागरिकांना नवी दिशा दाखविण्याचे उत्तम कार्य करत आहेत. आम्ही कलाकारदेखील या मॅरेथॉनमध्ये धावलो.
- जयवंत वाडकर, ज्येष्ठ अभिनेते
----
विरारकर असल्याचा मला अभिमान आहे. या महादिव्य मॅरेथॉनमध्ये अनेकांनी सराव करून सहभाग घेत वसईतील हिरव्यागार परिसरात धाव घेतली. येथील पोषक वातावरण आणि नागरिकांना उत्साहित केले. कलाकार व तरुणांनी व्यायामाची चालण्याची सवय बाळगावी व आरोग्य सुदृढ ठेवावे.
- समीर चौगुले, अभिनेता
---
आपल्या जीवनात सातत्याने स्पर्धा सुरू असतात. शरीराचीदेखील या काळात काळजी घेणे गरजेचे आहे. मॅरेथॉन ही केवळ एक दिवसाची मर्यादित स्पर्धा नाही, तर त्यातून आपण आयुष्यभर आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, हा मंत्र देत आहे. त्यामुळे वसई विरारकरांचा उपक्रम देशासाठी प्रेरणादायी आहे.
- अरुण कदम, अभिनेता
----------
सेल्फीचा मूड
देशभरातून आलेले स्पर्धक हे रस्त्यावरून धावत असताना नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली. या वेळी काहींना सेल्फीचा आनंद घेतला; तर अभिनेत्यांनादेखील हा सेल्फीचा मोह आवरता आला नाही.
-------------
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक धावले
स्पर्धेत लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांनीही हिरिरीने सहभाग घेतला. या वेळी दौड पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे दिसून आले; तर महिलांचा उत्साहदेखील वाखाणण्यासारखा होता.
------------
तरुणांचा आरोग्याप्रति संदेश
मॅरेथॉनमध्ये तरुणांनी प्रचंड प्रमाणात उत्साह दाखवला. मॅरेथॉन मार्गावरून धावत असताना नागरिकांना हात दाखवत मार्गक्रमण करत होते त्यातून तरुण फळीने आरोग्याप्रति संदेश दिला.
-----------
गार वारा अन्‌ धाव
सकाळी सुरू झालेल्या या स्पर्धेत हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. थंडी असल्याने गार वारा वाहत होता, अशा आल्हाददायक वातावरणात स्पर्धकांची धाव ऊर्जात्मक दिशेने पार पडली.
--------------
भांगडा ठरले आकर्षण
वसई पश्चिम येथील नवघर माणिकपूर भागात कलाकार मंडळी भांगडा करत होती. या वेळी धावपटूदेखील धावताना रममाण होऊन भांगडा करत करत धाव घेत असल्याचे दृश्य दिसून आले.