देवगंधर्व महोत्सवाचा थाटात सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगंधर्व महोत्सवाचा थाटात सांगता
देवगंधर्व महोत्सवाचा थाटात सांगता

देवगंधर्व महोत्सवाचा थाटात सांगता

sakal_logo
By

कल्याण, ता. ११ (बातमीदार) : प्रतिष्ठेचा संगीत महोत्सव म्हणून देशभरात नावाजलेल्या कल्याण गायन समाज आयोजित एकविसाव्या देवगंधर्व महोत्सवाची रविवारी (ता. ११) थाटात सांगता झाली. स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांचे प्रायोजिकत्व लाभलेल्या या वर्षीच्या महोत्सवाचे उद्‌घाटन अध्यक्ष केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे, उपाध्यक्ष सुप्रसिद्ध वकील सचिन शेटे, गायिका मंजुषा कुलकर्णी पाटील, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक देवोजीत गोस्वामी तसेच गायन समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडले. महोत्सवाच्या पहिल्या सत्राची सुरुवात गायिका मंजुषा कुलकर्णी-पाटील यांच्या शास्त्रीय गायनाने झाली.
दुसऱ्या सत्रात आघाडीचे तबलावादक पं. विजय घाटे यांच्या कल्पनेतून साकार झालेला मेलोडीक रिदम हा कार्यक्रम सादर झाला. तब्बल दीड तास सूर आणि ताल यांच्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. संपूर्णपणे अभिजात शास्त्रीय संगीतावर आधारित अशा या कार्यक्रमाची सुरुवात राग बागेश्रीतील त्रितालातील सरस्वतीवंदनेने झाली. गायन सुरंजन खंडाळकर, सतार उस्ताद शाकीर खान, कथक नृत्य शीतल कोलवलकर या सगळ्यांना आपल्या तालावर खेळवत पं. विजय घाटे यांनी रसिकांना अक्षरशः खिळवून ठेवले. हार्मोनियमवर अभिषेक शिनकर यांनी उत्तम साथ दिली. मिश्र किरवाणी मधील ‘तोरे बिना मोहें चैन नाही, ब्रिज के नंदलाला ही ठुमरी पेश करून त्यांनी आपला कार्यक्रम संपवला. सूर आणि ताल यांचा समतोल हे या संपूर्ण कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.