विरार विनयभंग प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरार विनयभंग प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग
विरार विनयभंग प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग

विरार विनयभंग प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग

sakal_logo
By

नालासोपारा, ता. ११ (बातमीदार) : धावत्या कारमध्ये २१ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिच्या १० महिन्यांच्या बाळाला कारमधून फेकल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली होती. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत महिलेच्या जबाबावरून मांडवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ज्या कारमध्ये घटना घडली होती, ती कार जप्त करून, आरोपी कारचालकाला अटक करण्यात आली आहे. आज सकाळी पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी घटनास्थळाला भेट देत गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. तसेच या गुन्ह्याचा तपास वेगवान आणि चोख करण्यासाठी मी स्वतः कटिबद्ध असेन, असे आश्वासनही सदानंद दाते यांनी दिले आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार फाट्याजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गुजरात पासिंग असणाऱ्या इको कारमधील चालक आणि कारमधील अन्य ३ जणांनी महिलेचा विनयभंग करून, तिच्या १० महिन्यांच्या बाळाला धावत्या कारमधून फेकून दिले, या वेळी मुलीला वाचवण्यासाठी महिलेनेही कारमधून उडी मारली. यात मुलीचा मृत्यू झाला; तर महिला जखमी झाली. या वेळी महामार्गावर गस्त घालणाऱ्या पोलिसांना विरार फाटा ब्रिज सुरू होण्याअगोदरच एक महिला आणि तिचे बाळ रस्त्यावर पडलेले दिसले, तेव्हा महामार्ग पोलिस प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब पाटील आणि त्यांच्या पथकाने पीडित महिला आणि १० महिन्यांच्या बाळाला तात्काळ उचलून प्रथम वसईतील संस्कृती, नंतर प्लॅटिनम रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरने बाळाला मृत घोषित केले. नंतर महिलेला पालिकेच्या तुळिंज रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी महिलेने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी तात्काळ इको कारचालकाला कारसह ताब्यात घेत रात्री उशिरा मांडवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक केली.

----------
- घटना अत्यंत संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाची असल्याने आम्ही तात्काळ हत्या आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास पारदर्शक आणि उत्तम पद्धतीने व्हावा, यासाठी हा तपास गुन्हे शाखा करणार आहे. यावर स्वतः गुन्हे पोलिस उपायुक्त आणि मी स्वतः लक्ष ठेवणार आहे. या गुन्ह्याचा वेगवान आणि चोख तपास करणार आहोत.
- सदानंद दाते, पोलिस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय


शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आक्रमक
विरार ता. ११ (बातमीदार) : विरारच्या घटनेत गाडीतील सहप्रवाश्यांनी तिचा विनयभंग करून तिच्या १० महिन्याच्या बालकांस गाडीतून फेकून दिले, यामध्ये बालकाचा मृत्यू झाला. या प्रकाराची दखल घेत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी पालघरने मांडवी, विरार पोलिस स्थानक येथे गुन्हे विभागाचे पोलिस उपायुक्त अविनाश आंबूरे, पोलिस उपायुक्त राम देशमुख, अतिरिक्त पोलिस आयुक्त गुन्हे विभाग अमोल मांडवे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांची भेट घेऊन गुन्हेगारावर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी महिला आघाडी पालघर जिल्हा सघंटक आणि माजी नगरसेविका किरण चेंदवणकर,मउपजिल्हा संघटक नम्रता ठाकूर, ॲड. कल्याणी पाटील, माजी पंचायत समिती सभापती अनुजा पाटील, उपशहरसंघटक योगिता पाटील, सुदेशना मकासरे, उपशाखा संघटक संयुक्ता देसाई, सोनाली चव्हाण, हेमलता भगत, ममता चव्हाण, रोशनी जाधव, साक्षी जाधव, युवती विभाग अधिकारी स्नेहा पांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.