
अंगावर थुंकल्याने एकाची हत्या
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : अंगावर थुंकल्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत तरुणाने एकाची हत्या केल्याची घटना डोंबिवली पश्चिमेला घडली. विजय पटवा (वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कैफ जावेद खान (वय १९) याला अटक केली आहे.
डोंबिवली पश्चिमेतील चिंचोड्याचा पाडा परिसरातील एच. पी. पेट्रोल पंपासमोर रस्त्यावरून शनिवारी दुपारी पटवा हे आपल्या दुचाकीवरून जात होते. या वेळी कैफ हा रस्त्याने चालत जात होता. कैफ खान हा चालताना रस्त्यावर थुंकला. त्याची थुंकी पटवा यांच्या अंगावर उडाली. याप्रकरणी पटवा यांनी कैफला जाब विचारला. या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. कैफने पटवा यांना ठोशा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. या हाणामारीत विजय हे रस्त्यावर बेशुद्ध होऊन पडले. त्यांना उपचारांसाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात हलवण्यात आले, पंरतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. विष्णूनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे कैफ याची ओळख पटवत त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांनी दिली.