
नैराश्येतून उच्चशिक्षित तरुणीची आत्महत्या
वाडा, ता. ११ (बातमीदार) : तालुक्यातील निंबवली येथील एका उच्चशिक्षित तरुणीने नैराश्यातून रविवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ममता परशुराम परेड (वय २४) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील निंबवली येथे ममता परेड ही तरुणी कुटुंबासह राहत होती. तिचे शिक्षण एम.ए. झाले असून ती पुण्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. तसेच तिने पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. गेल्या दोन महिन्यांपासून ती नैराश्यात होती. शनिवारी रात्री जेवण आटोपून सर्व झोपी गेले होते, पण पहाटेच्या सुमारास ममताची आई उठल्यावर तिला घराच्या बाहेर ममताने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.
ममताला वसई महानगरपालिकेत जनसंपर्क अधिकऱ्याची नोकरी लागली असून ती सोमवारपासून कामावर रुजू होणार होती. त्याआधीच तिने अशा प्रकारे जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.