अपुऱ्या बस फेऱ्यांमुळे प्रवाशांची गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपुऱ्या बस फेऱ्यांमुळे प्रवाशांची गैरसोय
अपुऱ्या बस फेऱ्यांमुळे प्रवाशांची गैरसोय

अपुऱ्या बस फेऱ्यांमुळे प्रवाशांची गैरसोय

sakal_logo
By

रेवदंडा, ता. १२ (बातमीदार) ः रेवदंडा बसस्थानक अलिबाग आगाराच्या कार्यक्षेत्रात येत असून दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ होते. मात्र अपुऱ्या बस फेऱ्यांबरोबरच सुविधांची वानवा असल्‍याने प्रवासी त्रस्‍त आहेत.
बस स्थानकालगत झाडेझुडपे वाढली आहेत. याठिकाणी संरक्षण भिंत नसल्‍याने खासगी गाड्याही उभ्‍या केल्‍या जातात. मुख्य इमारतीवरील रेवदंडा बसस्थानकाचा फलकही गायब आहे. स्‍थानकात ठिकठिकाणी खड्डे पडले असून खडी वर आली आहे. पावसाळ्यात याठिकाणी तळे साचत असल्‍याने डांबरीकरणाची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
३५ वर्षांपूर्वी कुंडलिका खाडीवर पूल बांधण्यात आला आणि रोहा, मुरूड व अलिबाग अशा तीन ठिकाणच्या मार्गावर प्रवास करण्यासाठी रेवदंडा बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण बनले. त्यानंतर काही वर्षांनी मुरूड आगार सुरू झाले आणि अलिबाग आगारामार्फत रेवदंडा बसस्थानकातून धावणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या बंदच झाल्‍या. त्‍यामुळे ठाणे, कल्याण, मुंबई, पुणे या ठिकाणी ये-जा करण्यासाठी मुरूड आगारातून सुटणाऱ्या बसवर अवलंबून राहावे लागते.
खाडीपूल सुरू झाल्‍यानंतर वर्दळ वाढल्‍याने पहाटे साडेपाच ते रात्री दहापर्यंत दोन पाळ्यांमध्ये अलिबाग आगारामार्फत वाहतूक नियंत्रक ठेवण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांना चौकशी कक्षातून बस फेऱ्या, वेळापत्रक, थांब्‍यांबाबत अचूक माहिती मिळायची. मात्र बऱ्याचदा कक्ष बंद असल्‍याने प्रवाशांसह पर्यटकांची गैरसोय होते.
बसस्‍थानकातील वेळापत्रकही कालबाह्य झाल्‍याने पर्यटनासाठी, सुटीत मौजमजा करण्यासाठी आलेल्‍या प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होते. बसस्थानकात मुख्य इमारतीच्या भिंती, तावदाने मोडकळीस आली आहेत. स्वच्छतागृहाची दुर्दशा झाली आहे.पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे सुशोभीकरण केली असले तरी अनेकदा टाकी कोरडी असते. त्‍यामुळे प्रवाशांना पाणी विकत घ्‍यावे लागते.


बसस्‍थानकातील सेवा
- अलिबाग आगारामार्फेत रेवदंडा बस स्‍थानकातून १३ बस चालवल्या जातात. रोहा आगारामार्फत १२ फेऱ्या सुरू असून मुरूड आगारामार्फत एसटी व एशियाड यांच्या १७ फेऱ्या सुरू आहत.
- दिवसाला जवळपास २५०० हजार प्रवाशांची वर्दळ असते. यात शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.

प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी कायमच प्रयत्न केला जात आहे.
रेवदंडा स्थानकात पडलेले खडडे, चक्रीवादळात झालेले नुकसान, स्वच्छतागृह तसेच स्थानक दुरुस्तीसाठी वरिष्ठ कार्यालयात प्रस्‍ताव पाठवण्यात आला आहे.
- अजय वनारसे, आगार व्यवस्थापक, अलिबाग

रेवदंडा बसस्थानकात अनेकदा वाहतूक नियंत्रक नसल्‍याने अचूक माहिती मिळत नाही. अनेकदा बसचे वेळापत्रक कोलमडते. तर काही वेळा बस लवकर सुटत असल्‍याने प्रवाशांची पंचाईत होते. नाइलाजाने खासगी वाहतुकीचा पर्याय स्‍वीकारावा लागत असल्‍याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
- फैज सोलकर, प्रवासी

रोहा आगाराने रोहा ते अलिबाग रेवदंडामार्गे बस सुरू कराव्यात, जेणेकरून शिक्षणासाठी अलिबागमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट सेवा मिळेल.
- आयुष काजारे, विद्यार्थी