
रोटरीच्या कार्निव्हलला अंबरनाथकरांचा प्रतिसाद
अंबरनाथ, ता. १२ (बातमीदार) : सकाळी बोचऱ्या थंडीची तमा न बाळगता रोटरी क्लबच्या पुढाकाराने आयोजित कार्निव्हल या विविधरंगी धमाल, मनोरंजन, आरोग्य विषयक कार्यक्रमात भाग घेत अंबरनाथकरांनी मनमुराद आनंद लुटला. यावेळी शिवगंगानगरजवळील रस्ता नागरिकांच्या गर्दीने तुडुंब भरून गेला होता.
अंबरनाथला विविध रोटरी क्लबच्या वतीने रविवारी सकाळी कार्निव्हलमध्ये झुंबा, कराटे, योगा आदी विविध प्रकारचे कार्यक्रम सादर करण्यात आले. रोटरीचे चंद्रकांत कोवळेकर यांच्या हस्ते कार्निव्हलचे उद्घाटन झाले. आमदार डॉ. बालाजी किणीकर, रोटरी क्लबचे जिल्हा प्रांतपाल कैलास जेठाणी, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, गुलाबराव करंजुले, माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, कार्यक्रमाचे आयोजक सुबोध शहा, हेमंत गोगटे, सर्जेराव सावंत, अनिल राणे, निखिल चौधरी यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी, नागरिक, शालेय विद्यार्थी यांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता.
शालेय विद्यार्थ्यांनी ज्युडो कराटे, लाठी-काठी, ढाल-तलवारीच्या प्रात्यक्षिके सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. काही दिव्यांगांचा उत्साह लक्ष वेधून घेणारा होता. जिल्हा प्रांतपाल जेठानी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. सायकलिंग, स्केटिंग, योगासारखे प्रकार सादर करून व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. सुबोध शहा यांनी स्वागत केले. दत्ता घावट यांनी सूत्रसंचालन केले.