विकास आराखड्या विरोधात जन आक्रोश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकास आराखड्या विरोधात जन आक्रोश
विकास आराखड्या विरोधात जन आक्रोश

विकास आराखड्या विरोधात जन आक्रोश

sakal_logo
By

भाईंदर, ता.१२ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहराचा प्रारूप विकास आराखडा जनहित विरोधी असल्यामुळे तो रद्द करावा, अशी मागणी करत भाजप नेते माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर सोमवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिकांसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नरेंद्र मेहता यांनी आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
मिरा-भाईंदर शहराच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप विकास आराखड्यावर सर्वच राजकीय पक्षांनी आक्षेप नोंदवले आहेत. या आराखड्याविरोधात तब्बल चार हजाराहून अधिक हरकती देखील दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या आराखड्यामुळे नागरिकांचे भवितव्य धोक्यात येणार असल्याने आराखडाच रद्द करावा, या मागणीसाठी माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी सोमवारी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. भाईंदर पश्चिम येथील बावन जिनालय या जैन मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झाली.
आधीच्या विकास आराखड्यात असलेल्या शाळा, महाविद्यालय, उद्याने, मैदाने, महापालिकेच्या मुख्यालयाची प्रस्तावित इमारत आदी हटवून त्याजागी निवासी क्षेत्र आरक्षित करण्यात आले आहे. हे बदल कोणाच्या फायद्यासाठी करण्यात आले आहेत असा प्रश्नही मेहता यांनी यावेळी उपस्थित केला. मोर्चात माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, डिंपल मेहता, माजी उपमहापौर हसमुख गहलोत, प्रशांत दळवी, धृवकिशोर पाटील, भगवती शर्मा यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी शिष्टमंडळाने आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. विकास आराखड्यातील त्रुटींसंदर्भात घेण्यात आलेले आक्षेप राज्य सरकार व संबंधित अधिकाऱ्‍यांपर्यंत पोहोचविण्यात येतील असे आश्वासन आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले.

आराखड्यात असंख्य त्रुटी
प्रस्तावित विकास आराखडा लोकाभिमुख नसून त्यात असंख्य त्रुटी आहेत. आगामी वीस वर्षात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन शहरासाठी नविन उद्याने, मैदाने, वैद्यकीय सुविधा, पशू वैद्यकीय सेवा याव्यतिरिक्त रुग्णालय, महाविद्यालय, पोलिस ठाणे, आयटी पार्क, एअर ऍम्ब्युलन्स आदी सुविधांची आराखड्यात तरतूदच करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांचे भवितव्य अंधारात आहे. विशेष म्हणजे आराखड्यावर मिरा-भाईंदर महानगरपालिकेने देखील हरकती नोंदवल्या आहेत, अशी माहिती मेहता यांनी यावेळी दिली.