
बेकायदा बांधकाम शोधासाठी १३ पथके
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत ६५ विकसकांनी बेकायदा बांधकाम उभारली असून, या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासन कामाला लागले आहे. यासाठी प्रशासनाने विशेष सर्व्हेअर नेमले होते; मात्र हा आदेश आयुक्तांनी लागलीच मागे घेतल्याने पालिकेच्या कारवाईविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अनधिकृत बांधकामांची छाननी करण्यात कोणतीही दिरंगाई होऊ नये म्हणून पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी १३ पथके तैनात केली आहेत. या पथकांना पाच बनावट प्रकरणे देण्यात आली असून, त्याची इत्यंभूत माहिती गोळा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. पालिका आयुक्तांच्या या तत्परतेमुळे किमान ६५ विकसकांनी केलेल्या बांधकामांचा तरी तपास जलद गतीने होईल, असे आशादायी चित्र दिसून येत आहे.
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. या बांधकामातील सदनिका विक्री करताना काही अडचणी येत असल्याने विकसकांनी पालिकेची बेकायदा परवानगी कागदपत्र तयार केली आणि त्याआधारे रेराची नोंदणी प्रमाणपत्र मिळविले असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी ६५ विकसकांविरोधात पालिका प्रशासनाने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. ही अनधिकृत बांधकामे शोधून ती निष्कासित करण्याचे आदेश यापूर्वीच पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले होते.
-----------------------------
प्रत्येकी पाच बांधकामांची माहिती शोधण्याचे काम
बांधकामे शोधून त्याची पूर्ण पडताळणी करण्यासाठी मालमत्ता व नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना प्रभागातील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी दिली होती. या कर्मचाऱ्यांनी आपले काम सांभाळून सर्वेक्षण करण्याचे काम पूर्ण करावे, असे या आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र, त्यांना या आदेशातील काही बाबी लक्षात न आल्याने तो आदेश रद्द करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. हा आदेश रद्द झाल्याने अनधिकृत बांधकाम शोधून त्याची पडताळणी करण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून बांधकामासंबंधी माहिती शोधण्यासाठी १३ पथके नेमण्यात आली. त्यांना प्रत्येकी पाच बेकायदा बांधकामांची माहिती शोधण्याचे काम देण्यात आले आहे.
-------------------
सविस्तर माहिती गोळा
पालिका हद्दीत विकसकांनी महापालिकेच्या खोट्या परवानगीची कागदपत्रे तयार केली आणि ते खरे असल्याचे भासवून रेराकडून नोंदणीपत्र मिळविले आहे. त्याबाबत चौकशी करण्यासाठी १३ पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकाला पाच बनावट प्रकरणे देण्यात आली आहेत. यामध्ये इत्यंभूत माहिती जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जमिनीचा सर्व्हे नंबर, सातबारा, गाव नकाशा, गटबुक नकाशा काढणे, डीपीआर प्लॅन, इमारत बांधणारे विकसक, वास्तूविशारद त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर यांसह त्या इमारतीत किती लोक राहतात किंवा इमारत रिकामी आहे आदि माहिती गोळा करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
-----------------------------------------------
६५ विकसकांनी बेकायदा इमारती बांधून बेकायदा कागदपत्र तयार करत रेरा नोंदणी प्रमाणपत्र मिळविले आहे. त्यासंबंधी चौकशी करण्यासाठी १३ पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके बांधकामांची इत्यंभूत माहिती गोळा करणार आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत पालिका प्रशासनाकडे या बांधकामांची माहिती जमा होईल. त्यानंतर त्यांना नोटीस पाठविणे, कागदपत्रांची छाननी, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे. बांधकाम बेकायदा असेल तर ते निष्कासित करण्यासंबंधी कारवाई, नागरिक रहात असल्यास पोलिसांमार्फत इमारत खाली करून निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे.
-डॉ. भाऊसाहेब दांगडे, आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका