
... तर महापालिकेच्या शाळांच्या सीबीएससी व आयसीएससीत रुपांतरास मान्यता
शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे आश्वासन
भाईंदर, ता. १२ (बातमीदार) : दर्जेदार शिक्षण देण्यासाठी राज्य सरकार अनेक निर्णय घेत आहे. मिरा-भाईंदर महापालिकेच्या काही शाळा सीबीएससी, आयसीएससी व इंटरनॅशनल शाळेमध्ये रूपांतरित केल्या तर त्याला विशेष बाब म्हणून राज्य सरकारकडून मान्यता देण्यात येईल. महापालिका आयुक्तांनी तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा त्याचा विचार केला जाईल असे आश्वासन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. प्रताप सरनाईक फाउंडेशन व संस्कृती युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून भाईंदरमध्ये संस्कृती मिरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले आहे. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दीपक केसरकर यांनी महोत्सवाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
मिरा-भाईंदर महापालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती व उर्दू माध्यमांच्या ३६ शाळा आहेत. यातील काही शाळांमधील पटसंख्या कमी होत चालली आहे. अशा शाळांपैकी काही शाळा सीबीएससी व आयसीएससी इंग्रजी माध्यमाच्या तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांमध्ये रुपांतरित कराव्यात, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी कार्यक्रमात केली. मिरा-भाईंदर महापालिकेला स्वतःच्या इंग्रजी शाळा सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी व पहिले पाच वर्षे महापालिकेला त्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी सरनाईक यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली. खासगी शाळांचे भरमसाठ शुल्क गरीब विद्यार्थ्यांना परवडत नाहीत. त्यामुळे मिरा-भाईंदर महापालिकेने सीबीएससी व आयसीएससी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याची विनंती सरनाईक यांनी केली. यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर, खासदार राजेंद्र गावित, माजी आमदार रवींद्र फाटक, युवा नेते पूर्वेश सरनाईक, आयुक्त दिलीप ढोले आदी उपस्थित होते. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सिंग रावणा व सोनू सिसोदिया यांच्या गाण्याचा कार्यक्रम पार पडला.
प्रस्ताव सादर करावा
‘कन्स्ट्रक्शन टीडीआर’च्या माध्यमातून ज्या इमारती महापालिकेकडे हस्तांरतीत होतील, त्या इमारतीमध्ये मिरा-भाईंदर महापालिकेच्या सीबीएससी व आयसीएससी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु कराव्यात, महापालिकेची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने सुरुवातीला या शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी देताना शिक्षक भरती व इतर व्यवस्था उभारण्यासाठी आर्थिक अनुदान महापालिकेला द्यावे, असे आमदार सरनाईक म्हणाले. त्यावर नविन शाळांना सध्या मान्यता देता येत नसली तरी सध्या मान्यता असलेल्या व सुरू असलेल्या महापालिकेच्या काही शाळा सीबीएससी व आयसीएससी मध्ये रुपांतर करण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर करावा अशी सूचना शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिली.