चंद्रकांत पाटील यांचे विधान चुकीचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील यांचे विधान चुकीचे
चंद्रकांत पाटील यांचे विधान चुकीचे

चंद्रकांत पाटील यांचे विधान चुकीचे

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल वापरलेला शब्द चुकीचा असला तरीही त्या शब्दाचा निषेध संयमित शब्दांनी व लोकशाही मार्गाने व्हायला हवा. लोकशाहीत कोणत्याही प्रकारच्या हिंसेला स्थान नाही हे ध्यानात घ्यावे, तसेच पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने आता हा विषय सर्व राजकीय पक्ष व संघटनांनी बंद करावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते ॲड. शशिकांत पवार यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या विधानांमुळे त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार नुकताच पुणे येथे झाला. शाई फेकण्याचा प्रकारही तितकाच चुकीचा आहे. असे हिंसक प्रकार करताना बिकट प्रसंग ओढवू शकतो, हेसुद्धा संबंधितांनी ध्यानात घ्यावे, असेही पवार यांनी म्हटले आहे. मुळात सर्वांनी शब्द जपूनच वापरले पाहिजेत, पण बोलण्याच्या ओघात एखाद्याच्या तोंडून कमी-जास्त शब्द गेलाच तर त्याचा त्यामागील हेतूदेखील पाहिला पाहिजे. हेतू वाईट नसेल व त्या व्यक्तीला नंतर आपली चूक कळून त्याने दिलगिरी व्यक्त केल्यावर आपण मोठ्या मनाने त्याला माफ केले पाहिजे. कारण तीच महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.

राजकारणी लोकांनीसुद्धा महापुरुषांबद्दल बोलताना संयमाने बोलले पाहिजे. बोली भाषेतील उदाहरणे देताना महापुरुषांच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल अशी विधाने करू नयेत हेदेखील तितकेच खरे आहे. विशेषतः आभाळाएवढे काम करून गेलेल्या महापुरुषांची कशाही अर्थाने बरोबरी आपण कोणीच करू शकत नाही, याची जाणीव सर्वांनीच ठेवली पाहिजे; मात्र एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. लोकशाहीत चंद्रकांत पाटील यांच्या चुकीच्या शब्दांचा निषेध जरूर केला पाहिजे, पण तो शांततापूर्ण मार्गानेच करायला हवा. पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने आता दोन्ही बाजूंनी संयम राखावा, असेही पवार यांनी म्हटले आहे.