‘जी-२०’च्या बैठकांमधून जागतिक नेतृत्वाची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जी-२०’च्या बैठकांमधून जागतिक नेतृत्वाची संधी
‘जी-२०’च्या बैठकांमधून जागतिक नेतृत्वाची संधी

‘जी-२०’च्या बैठकांमधून जागतिक नेतृत्वाची संधी

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ ः भारताला वेगवेगळ्या क्षेत्रांत जागतिक नेतृत्व मिळवून देण्याचा मार्ग जी-२० परिषदेच्या निमित्ताने होणाऱ्या वेगवेगळ्या बैठकांमधून मिळेल. भारतासह अन्य विकसित देशांनाही या निमित्ताने मोठी संधी चालून आली आहे, अशी माहिती नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आज येथे दिली.
कांत हे वर्षभर जी-२० परिषदांमध्ये भारताची बाजू मांडतील. जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर भारतातील अनेक शहरांत जी-२० च्या कार्यकारी गटांच्या बैठका होणार आहेत. त्यानिमित्त जगाला तसेच वेगवेगळ्या देशांना भेडसावणाऱ्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल. या आठवड्यात मुंबईत जी-२० चे अनेक कार्यक्रम होत असून त्याची माहिती आज अमिताभ कांत यांनी दिली. यानिमित्ताने प्रथमच परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यक्रम भारत ठरवणार आहे, असेही त्यांनी दाखवून दिले.
भारताने गेल्या काही वर्षांत विकसित राष्ट्र होण्याच्या दृष्टीने उचललेली पावले तसेच सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न यांची माहितीही आपल्याला यानिमित्ताने जगासमोर मांडता येईल. निर्यात, स्वच्छ ऊर्जेची निर्मिती, हरित हायड्रोजन या क्षेत्रात भारत जगात अग्रस्थान मिळवू शकतो; मात्र त्यासाठी वेगवेगळ्या अर्थसंस्थांनी उद्योगांना मदत केली पाहिजे. या सर्व मुद्द्यांची चर्चा या बैठकीत होईल असेही ते म्हणाले.
...
भारत दीपस्तंभ
‘वसुधैव कुटुंबकम’ हे या परिषदेचे घोषवाक्य असल्याने साऱ्याच विकसनशील देशांच्या कल्याणाकरिता भारत यानिमित्ताने प्रयत्न करेल, असे अमिताभ कांत यांनी आवर्जून सांगितले. सध्या सारे जग मंदीसदृश वातावरणातून जात असले तरीही भारताची परिस्थिती मात्र अत्यंत आशादायी आहे. त्यामुळे या संकटातून मार्ग दाखवणारा दीपस्तंभ म्हणून जग भारताकडे आशेने पाहत आहे. तसेच ग्लोबल वॉर्मिंग विरुद्धच्या विशेषतः विकसनशील देशांच्या लढ्याला बळ मिळावे यासाठी वित्तसंस्थांनी कर्ज देण्याचे निकष बदलावेत यासाठीही या व्यासपीठावरून भारत प्रयत्न करू शकतो, असेही ते म्हणाले.
...
देशांमधील दरी साधण्याची...
भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ५६ शहरांमध्ये जी-२० परिषदेच्या एकूण २१५ बैठका होतील. भारतात मोठ्या संख्येने स्टार्टअप असल्याने या परिषदेत त्यांनाही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न राहील, विकसनशील आणि विकसित देशांमधील दरी साधण्याची मोठी संधी यानिमित्ताने आपल्याला आली आहे, असेही अमिताभ कांत म्हणाले.