
‘बाळासाहेबांची शिवसेने’च्या दोन गटात राडा
उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : रस्त्याच्या विकास कामांची पाहणी करताना श्रेयवादावरून ‘बाळासाहेबांची शिवसेना’च्या दोन गटांत लाठीहल्ला करून तुफान राडा झाल्याची घटना उल्हासनगरात आज (ता. १२) घडली आहे. याप्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
तालुक्यातील मानेरा गावानजीक १७ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे १६ डिसेंबर रोजी येणार आहेत. त्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी अरुण आशान, विजय पाटील, विजय जोशी यांच्यासह एकनाथ शिंदे गटातील पदाधिकारी उपस्थित होते. याच वेळी शिंदे गटातीलच वसंत भोईर यांचा मुलगा आणि विजय जोशी यांच्यात श्रेयवादावरून हाणामारी सुरू झाली. ती पाहून दोघांच्या सहकाऱ्यांकडून लाठीहल्ला सुरू झाला. या घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या राड्यात जखमी झालेल्यांना शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.