
सोनेचोरी प्रकरणात दोन रेल्वे पोलिसांना अटक
मुंबई, ता. १२ : मुंबईतील ट्रॉम्बे पोलिसांनी सोन्याच्या चोरीप्रकरणी दोन रेल्वे पोलिस (जीआरपी) कॉन्स्टेबलसह तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून २.५ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. आरोपी नितीन पाटील तसेच कॉन्स्टेबल युवराज नाटेकर आणि कॉन्स्टेबल विकास पवार, अशी आरोपींची नावे आहेत.
ट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा व्यापार करणारे राजेंद्र पवार यांच्याकडे नितीन पाटील हा शुद्ध सोने ज्वेलर्सकडे डिलिव्हरी देण्याचे काम करीत होता. ८ डिसेंबरला तो मंगलोरवरून अडीच किलो सोने घेऊन निघाला होता, परंतु त्यानंतर त्याचा फोन बंद येऊ लागला. त्यानंतर काहीच तासांनी त्याने आपल्याला कोणी तरी रेल्वे ट्रॅकवर आणून लुटले असल्याचे आपल्या मालकाला सांगितले. मालकाला काही तरी बनाव असल्याची शंका आली. त्यांनी ट्रॉम्बे पोलिसांकडे ८ डिसेंबरला तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ नितीन पाटील या कामगाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून त्यांनी लंपास केलेले सोने जप्त केले आहे.