
वज्रेश्वरीत गौणखनिज वाहतूक सुसाट
वज्रेश्वरी, ता. १३ (बातमीदार) : वाडा तालुक्यात असलेल्या गौणखनिज खाणीतून रोज हजारो टन दगड, माती, खडी याचा उपसा करून अंबाडी, वज्रेश्वरी शिरसाड मार्गे मुंबई, वसई, ठाण्यात व इतरत्र पाठविले जाते. गौणखनिजची सुसाट वाहतूक करणाऱ्या हायवा व डंपरमुळे येथील ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. दररोज येथे छोटे-मोठे अपघात होत असून, परिसरात वाहतूककोंडी देखील वाढली आहे. त्यामुळे या वाहनांना येथून वाहतूक न करता बायपास मार्गे सोडण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे यांनी केली आहे
बुधावली, डोंगस्ते येथील डोंगरावर मुबलक प्रमाणात खडकाळ जमीन आहे. या डोंगरावर बाहेरगावांहून आलेल्या धनिकांनी जमीन मालक व शेतकऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणांत जमीन खरेदी केली आहे. डोंगरावरील जमिनीत क्रशर मशीन बसवून हजारो टन दगड काढून रेती, माती, खडी, कच असे खनिज मुंबई, ठाणे, वसई अशा शहरात रस्त्याच्या अथवा इमारतीच्या बांधकामासाठी पाठवले जाते.
वाहनांमुळे रस्त्यावर मोठे खड्डे
गौण खनिज वाहतूक हायवा किंवा डंपर या वाहनातून केली जाते. क्षमतेपेक्षा अधिक माल घेऊन जाणारी ही वाहने रात्री-बेरात्री सुसाट बेगाने वज्रेश्वरीमधून जातात तर काही वाहनाना नंबर प्लेटही नसतात. गावांतील रस्त्यावरून जाताना अवजड वाहनांमुळे रस्ता खचल्याने मोठे खड्डे पडतात. मोठ्ठ्या खड्ड्यात खेड्यातील लहान वाहने व एसटी गाड्या चालू शकत नाहीत.
विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात
वज्रेश्वरी परिसरात पाच शैक्षणिक संस्था व कन्या विद्यालय, महिला महाविद्यालय आहेत. त्यामध्ये हजारो मुले-मुली येथे शिक्षण घेतात. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातामध्ये विद्यार्थ्यांचे जीवही गेले आहेत. याबाबतची नोंद गणेशपुरी पोलिस ठाण्यात आहे. अंबाडी, वज्रेश्वरी-शिरसाड या मार्गांवर गौण खनिज वाहतून करणारी वाहने सुसाट जातात. यामुळे गावातील लोकांना बाजारहाट अथवा इतर कामांसाठी बाहेरगावी जाण्यास अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. गाड्यातील माती, कच असे गौण खनिज वाहतूक करतांना झाकलेले नसल्याने हवेत उडून ग्रामस्थांच्या डोळ्यात जाते.
--------------------------------------
कोट
विद्यार्थ्यांना, छोट्या वाहनचालकांना व पायी प्रवास करणाऱ्यांना गौण खनिज वाहतूक करणाऱ्या हायवा व डंपरमुळे लहान मोठ्या शारिरिक इजा व अपघातांचा सामना करावा लागतो. आरटीओने येथे फिरते पथक नेमून याची दखल घ्यावी.
-मिलिंद कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, वज्रेश्वरी
---------------------------
भिवंडी-अंबाडी-वज्रेश्वरी मार्गांवरून अनेक गाड्या गौण खनिजाची वाहतूक करीत असल्याच्या तक्रारी आहेत. या अनुषंगाने कारवाईसाठी विशेष गस्तीपथक नेमून मोटर वाहन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल.
-जयंत पाटील, अधीक्षक, विभागीय परिवहन कार्यालय, ठाणे