
ऑनलाईन फसवणुकीतील रक्कम पोलिसांनी गोठवली
घाटकोपर, ता. १३ (बातमीदार) ः ओशिवरा पोलिसांनी एका ऑनलाईन फसवणुकीतील हस्तांतरित झालेली तक्रारदाराची रक्कम त्वरित कारवाई करून गोठवली आहे. धर्मेश जयकिशोर व्यास या नवीन म्हाडा लोखंडवाला, अंधेरी येथे राहणाऱ्या तक्रारदाराने ऑनलाईन फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. ओशिवराचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर धनावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ७ डिसेंबर रोजी पीडित धर्मेश यांना त्यांच्या मोबाईल फोनवर पासपोर्टबद्दल कॉल आला होता. त्या वेळी त्यांना फोन करणाराने सांगितले की, तुमचा पासपोर्ट तयार आहे; मात्र डिस्पॅच कोड ब्लॉक झाला आहे. तुम्हाला काही रक्कम भरल्यानंतर दोन तासांत पासपोर्ट मिळेल. त्या वेळी धर्मेश चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते म्हणून त्यांनी घाईघाईने कॉलर नंबरवर ऑनलाईन पेमेंट केले. नंतर ९ डिसेंबर रोजी त्यांना एचडीएफसी बँक खात्यातून तब्बल ९९ हजार ९९९ रुपये इतकी रक्कम कापल्याचा मेसेज आला. त्यामुळे धर्मेश यांनी बँकेच्या संबंधित प्राधिकरणाला कळवले की आपण असा कोणताही व्यवहार केलेला नसून, आपली ऑनलाईन फसवणूक झाली आहे. त्यावर बँक व्यवस्थापकाने त्यांना सांगितल्यानुसार ते ओशिवरा पोलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. दरम्यान, ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. याबाबत मनोहर धनवडे यांनी उपनिरीक्षक सकुंडे, सायबर सेलचे उपनिरीक्षक दिगंबर कुरकुटे, अशोक कुंदे, विक्रम यांचा समावेश असलेली टीम तयार केली असून खाते गोठवण्यात आले आहे. याबाबत पोलिस तपास करत असून आरोपी लवकरच सापडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.