
पदपथांवर गॅरेजचे बस्तान
वाशी, ता. १३ (बातमीदार) ः नवी मुंबईमध्ये अनधिकृत गॅरेजची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी पदपथावर ही गॅरेज थाटण्यात आलेली आहेत. याचा अडथळा पादचाऱ्यांना होतो; मात्र अनेकदा तक्रार करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
शहरातील प्रत्येक नोडमध्ये गॅरेज थाटण्यात आली आहेत. वाशी सेक्टर १७, कोपरखैरणे, जुहू गाव, नेरूळ सेक्टर १३, बेलापूर, घणसोली, पामबीच मार्ग या ठिकाणी अशाप्रकारचे गॅरेज आढळून येत आहेत. हे गॅरेज मुख्य रस्त्यालगतच थाटण्यात येतात. त्यामुळे वाहन दुरुस्ती रस्त्यावरच करण्यात येते. यामुळे पादचाऱ्यांना अटथळा होतोच; पण येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांनाही याचा अडथळा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुरुस्तीच्या वेळी वाहनातून सांडलेल्या ऑईलमुळे अपघात होण्याची शक्यताही निर्माण होत आहे. काही गॅरेज रात्री उशिरापर्यंत चालवली जातात. तेथून येणाऱ्या आवाजामुळे परिसरातील शांततेची भंग होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
पालिकेने पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच पदपथावरून दुचाकी चालवल्या जाऊ नयेत, याकरिता लोखंडी बेरियर्स बसवले आहेत; परंतु अनेक ठिकाणी असे लोखंडी बेरियर्स तोडून गॅरेजच्या दुकानाची वाट मोकळी करण्यात आलेली आहे. अशाच गॅरेजमुळे पाम बीच मार्गावर एपीएमसी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्या ठिकाणी अनेकदा कारवाई करूनही ते बंद करण्यात पालिका व वाहतूक पोलिस अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. जादा भाड्याच्या लालसेपोटी रहिवासी इमारतीमधील व्यावसायिक गाळे गॅरेजला भाड्याने दिले जातात. त्यामुळे जागा मिळेल तिथे गॅरेजची दुकाने थाटली जात आहेत. परिणामी, शहरातील प्रत्येक गावासह सिडको विकसित नोडला गॅरेजचा विळखा बसला आहे.