अरुंद रस्त्यामुळे होते वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अरुंद रस्त्यामुळे होते वाहतूक कोंडी
अरुंद रस्त्यामुळे होते वाहतूक कोंडी

अरुंद रस्त्यामुळे होते वाहतूक कोंडी

sakal_logo
By

तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : कोपरखैरणे विभागात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या वाढत चालली आहे. पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत. त्यातच रस्त्यावर खोदकामे सुरू केल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्ता अधिक तोकडा पडत आहे. आधीच या रस्त्यावर अतिरिक्त वाहन पार्किंग होत आहे. त्यात भर पडल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

कोपरखैरणे येथील तीन टाकी व डीमार्ट समोरील रिक्षा थांबा वाहतूक कोंडीचे सर्वात महत्त्वाचे कारण ठरत आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे हा सर्वाधिक रहदारीचा मार्ग समजला जातो. या पट्यात रहिवासी संकुले, बाजार, मिनी मार्केट, छोटीमोठी दुकाने आहेत. सकाळी व संध्याकाळी तिथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. वाशी - कोपरखैरणे हा रस्ता रुंद असला तरी सेक्टर आठ ते पंधरा हा रस्ता मात्र अरुंद आहे. त्यापैकी एका टोकाला डी मार्ट स्टोअर असून या ठिकाणी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. रिक्षाचालकांनाही इथे कायम प्रवासी मिळत असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात रिक्षाही उभ्या असतात. प्रवासी चढ-उतार करताना येथेच थांबत असल्याने मागून येणाऱ्या वाहनास थांबावेच लागते. एक वाहन थांबले की त्याच्या मागोमाग अनेक वाहनांची रांग लागते. डी मार्ट या ठिकाणी तर सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत तर संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होते.

या परिसरात अनेक रुग्णालये आहेत. तेथील रुग्णवाहिकाही या कोंडीत अडकून पडतात. कोपरखैरणेमध्ये होणाऱ्या वाहतुकीबाबत राजकीय पक्षांकडून वाहतूक विभागाला वारंवार निवेदने देण्यात आली होती. मात्र, परिस्थिती आहे तशीच आहे. कोपरखैरणे भुयारी मार्गातूनही ठाणे - बेलापूर मार्गावरील गाड्या कोपरखैरणेमध्ये प्रवेश करतात. तसेच, तीनटाकीकडून सरळ रस्त्याच्या दिशेनेही वाहनांची रेल्वे स्थानक परिसरात जाण्यासाठी मोठी गर्दी असते. मात्र, या ठिकाणी एकही सिग्नल नसल्याने वाहनचालक वळण घेऊन रस्ता अडवून ठेवतात. त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये आणखीन भर पडत आहे.
---------
आमच्या वाहतूक विभागाकडून वारंवार कारवाई केली जाते. दुहेरी व तिहेरी वाहन पार्किंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, इतर नोडपेक्षा कोपरखैरणे परिसरातील रस्ते हे खूपच अरुंद आहेत. जागा तेवढीच पण लोकसंख्या व वाहने वाढली आहेत. अरुंद रस्ते असल्याने वाहतूक कोंडी होते. मात्र वाहतूक विभागाकडून दैनंदिन कारवाई केली जाते.
- उमेश मुंढे, एपीआय, वाहतूक विभाग