ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन
ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन

ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन

sakal_logo
By

नेरूळ, ता. १३ (बातमीदार) ः येथील ज्येष्ठ नागरिक संघ या संस्थेचा ३१ वा वर्धापन दिन सोहळा १२ डिसेंबर रोजी गणेश सभागृहात पार पडला. या वेळी महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी व्यासपीठावर मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे, आईस्कॉन - फेस्कॉनचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, सचिव दीपक दिघे, खजिनदार विकास साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी नार्वेकर म्हणाले की, नवी मुंबई महापालिका राबवत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांत ज्येष्ठ नागरिक संघ, नेरूळ या संस्थेमधील ज्येष्ठांचा सक्रिय सहभाग असल्याचा आपल्याला आदर वाटतो. या ज्येष्ठांच्या विविधांगी अनुभवाचा महापालिकेसाठी कसा उपयोग करून घेता येईल, यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. नवी मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिकाधिक विरंगुळा केंद्र उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले. आपण आयुष्यभर करत असलेले, आवडीचे काम निवृत्तीनंतर थांबवू नका. तरुणांना प्रोत्साहन द्या. आपले अनुभव शब्दबध्द करा. कारण अलिकडे आत्मचरित्रे वाचणाऱ्यांची संख्या वाढत असून आपले रुट्‌स शोधत परदेशस्थ भारतीयांची तरुण मुले भारतात येत असतात. त्यांना अनेकदा योग्य ती माहिती मिळत नाही. त्यांना हे लिखाण उपयोगी पडेल, असा सल्ला अ. पां. देशपांडे यांनी आपल्या भाषणातून या वेळी दिला. आप्पासाहेब टेकाळे यांनीही ज्येष्ठ नागरिक संघ नेरूळ संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या भरीव कार्याचा गौरव केला.

संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांनी प्रास्ताविकातून ज्येष्ठ नागरिक संघ राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या वेळी वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक तसेच वैवाहिक जीवनाची पन्नाशी गाठलेल्या जोडप्यांचा तसेच कार्यक्रमास उपस्थित विशेष निमंत्रितांचा सत्कार आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचित्रा कुंचमवार आणि विकास साठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाकरराव गुमास्ते, नंदलाल बॅनर्जी, रणजीत दीक्षित, दत्ताराम आंब्रे, अजय माढेकर, विजय सावंत, निर्मला शिंदे, कल्पना मोहिते, कमल आंगणे यांनी मेहनत घेतली.