
महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचा स्वच्छता बीच अभियान
कांदिवली, ता. १३ (बातमीदार) ः बोरिवली पश्चिम येथील महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या वतीने स्वच्छता बीच अभियान राबवण्यात आले. रविवारी (ता. ११) सकाळी ५४ सदस्यांनी स्वच्छता बीच अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेऊन जवळपास १२० किलो प्लास्टिक व इतर कचरा जमा केला. बोरिवली पश्चिम येथील महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या वतीने महिन्यातून एकदा स्वच्छता अभियान राबविण्यात येते. बीच मार्गदर्शक सचिन पाष्टे आणि गणेश नायनाक यांच्या सूचनेनुसार प्लास्टिक व इतर कचरा गोळा करण्यात आला. चार गट तयार करून प्रत्येक गटाला वेगवेगळे काम दिले होते. यामुळे कमी वेळात जास्त परिसर स्वच्छ झाला, असे पर्यावरण सैनिक शिरीष सबनीस यांनी सांगितले. महापालिकेने जमा झालेला कचरा उचलून नेण्यास मोलाचे सहकार्य केले.
दादरमध्येही मोहीम
प्रभादेवी (बातमीदार) ः मनसेच्या पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांच्या पुढाकारातून दादर या ठिकाणीही स्वच्छता मोहीम पार पडली. या वेळी ३० महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. माजी आमदार व मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनीदेखील या मोहिमेत सहभाग घेत समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती केली. या पुढील काळात समुद्रकिनारी संवर्धन आणि सुरक्षेवर भर देण्यात येणार असून समुद्रकिनारी सीसीटीव्ही, विद्युत रोषणाई तसेच शौचालये बांधण्यात येणार असल्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलणार असल्याचे शृंगारपुरे यांनी सांगितले.