तळोज्यातील रस्त्यांवर सिडकोचा अखेरचा हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळोज्यातील रस्त्यांवर सिडकोचा अखेरचा हात
तळोज्यातील रस्त्यांवर सिडकोचा अखेरचा हात

तळोज्यातील रस्त्यांवर सिडकोचा अखेरचा हात

sakal_logo
By

खारघर, ता. १३ (बातमीदार) : तळोजा वसाहत पालिकेकडे हस्तांतर झाल्यामुळे सिडकोकडून वसाहतीमधील विविध कामे केली जात आहेत. याअंतर्गत शहरातील रस्त्यांची दुरुस्ती केली जात असून यापुढे रस्त्याची कामे पालिका करणार असल्याने तळोज्यातील रस्त्यावर अखेरचा मुलामा सिडकोकडून दिला जात आहे.
तळोजा वसाहतीमधील रस्त्याची धूळधाण झाली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवरील धुळीमुळे नागरिक त्रस्त आहेत. अशातच तळोजा वसाहतीमधील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने बंद पडण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे तळज्यामधील सामाजिक तसेच राजकीय व्यक्तींनी पत्रव्यवहारातून रस्त्यांच्या दुरवस्थेकडे सिडकोचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे दहा महिन्यांपूर्वी सिडकोकडून तळोजा फेस एकमधील रस्त्याचा डांबरीकरणासाठी बारा कोटी; तर फेज दोनमधील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सोळा कोटी असे जवळपास अठ्ठावीस कोटी रुपये खर्चासाठी एप्रिल महिन्यात मंजुरी देऊन एका एजन्सीची नेमणूकदेखील केली होती; मात्र एजन्सीकडून मेअखेरीस काही सेक्टरमध्ये कामेदेखील केली गेली आहेत; मात्र पावसाळ्यात पुन्हा खड्डे पडतील या भीतीने सिडकोकडून पावसाळा संपल्यानंतर रस्त्याचे अखेरचे काम करून पालिकेच्या स्वाधीन केले जाणार आहेत.
------------------------
येथे रस्त्यांची चाळण
तळोजा वसाहतीत प्रवेश करताना भुयारी मार्ग ओलांडताच खड्ड्यांचे दर्शन होते. रॉयल रेसिडेन्सी बस थांब्याकडून पोलिस चौकीमार्गे नानासाहेब धर्माधिकारी आणि महावितरण कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सेक्टर अकरा अभिनव बँकेकडून सेक्टर चौदा मार्गे सेक्टर सात पॅराडाईस इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे. सेक्टर दोनमधील भागीरथी आणि मुनलाइट सोसायटीसमोरील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत; तर फेज दोनमध्ये नानासाहेब धर्माधिकारी पूल ओलांडताच घोटगाव आणि सिडको वसाहतीकडे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.