श्रीवर्धन आगाराचा ग्रामीण भागाला आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीवर्धन आगाराचा ग्रामीण भागाला आधार
श्रीवर्धन आगाराचा ग्रामीण भागाला आधार

श्रीवर्धन आगाराचा ग्रामीण भागाला आधार

sakal_logo
By

महेश पवार ः सकाळ वृत्तसेवा
म्‍हसळा, ता. १३ ः सुखकर आरामदायी प्रवासाबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरीची अनेक समस्यांना तोंड देत वाटचाल सुरू आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे अनेकदा एसटीचे वेळापत्रक कोलमडते. परंतु आगारांच्या दक्षतेमुळे व पेण विभागाने वेळोवेळी केलेली मदतीमुळे आजही एसटी ग्रामीण प्रवाशांची पहिली पसंती ठरत आहे.
श्रीवर्धन आगारातून ग्रामीण भागात अनेक फेऱ्या सुरू असून म्हसळा तालुक्‍याचा कारभारही येथूनच सुरू आहे. एसटी वेळेवर धावत नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचा खोळंबा होतो. त्यामुळे नाइलाजास्तव नागरिकांना जास्त भाडे देऊन खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागतो.
श्रीवर्धन आगारात जवळपास ५४ गाड्या कार्यरत असून सर्व एसटी ७ ते ८ वर्षांपासून चालवल्‍या जात आहेत. डेपोमध्ये सर्विस सेंटर असल्याने ब्रेक डाऊन झालेल्या गाड्यांचा दुरुस्ती याच ठिकाणी होते. दिवसभरात एसटीच्या २२९ फेऱ्या होत असून जवळपास नऊ हजार नागरिक प्रवास करतात. यातून दिवसाला ६ लाखांच्या वर उत्पन्न महामंडळाला मिळते. श्रीवर्धनसह म्हसळा तालुक्‍यातही याच आगाराच्या बस धावत असून कोरोना काळानंतर मंदावलेल्या एसटी फेऱ्या आता मात्र खेडोपाड्यात जलद गतीने धावत आहेत.

दक्षिण काशी, सुवर्णगणेशपर्यंत फेऱ्या
श्रीवर्धन आगार पूर्वी समस्यांनी ग्रासले होते, मात्र आता आगारात बऱ्यापैकी सुखसुविधा असल्याने प्रवाशांना चांगली सेवा दिली जात आहे. या आगारातून दोन तालुक्‍यातील गाव-खेड्यात तसेच दक्षिण काशी-हरिहरेश्वर तर सुवर्ण गणेश-दिवेआगर याठिकाणी जास्‍तीत जास्‍त फेऱ्या सोडल्‍या जातात.

श्रीवर्धन आगारातून प्रवाशांना अधिकाधिक चांगल्‍या सुविधा देण्याचा प्रयत्‍न केला जातो. मनुष्‍यबळ अपुरे असले तरी फेऱ्या मात्र वेळेत पूर्ण होतात. आगारात कमीत कमी चालक-वाहक ६० पेक्षा जास्त लागणार आहेत.
- तेजस गायकवाड, आगर व्यवस्थापक, श्रीवर्धन

श्रीवर्धन आगाराचा कारभार सुरळीत असला तरी अजून ग्रामीण भागात शेवटच्या टोकापर्यंत एसटी पोचली नाही. आगारातून ज्‍या लांबपल्याच्या गाड्या सुटतात, त्‍यांची विशेष देखभाल दुरुस्‍ती केली जाते. ग्रामीण भागातही फेऱ्या सुरू असल्‍याने नागरिकांना मोठा आधार होतो. त्‍यामुळेच डबघाईत आलेला आगाराने पुन्हा उभारी घेतली आहे.
- गणेश बोर्ले, सामाजिक कार्यकर्ता

आगाराची सद्यःस्थिती
कर्मचारी २४५
रिक्त पदे ६०-६५
दिवसाला उत्पन्न ५-६ लाख
कार्यरत गाड्या ५४
फेऱ्या २२९